Rinku Singh Talks About Dhoni Connection Of Finishing Skills: टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेमधील पहिला सामना फारच रोमहर्षक पद्धतीने जिंकला. 2 विकेट्स राखून भारताने अगदी शेवटच्या बॉलवर विजय मिळवत मालिकेमध्ये 1-0 ची आघाडी घेतली. सामन्यामध्ये कर्णधार सूर्यकुमार यादवने केलेल्या 80 धावा आणि ईशान किशनने केलेल्या 58 धावांच्या जोरावर विजय मिळवता आला. मात्र या सामन्यामध्ये विजयी धावा कढणाऱ्या रिंकू सिंहने खेळलेली छोटी पण महत्त्वाची खेळी चाहत्यांच्या लक्षात राहिली. रिंकू सिंहने 14 बॉलमध्ये 4 चौकारांच्या मदतीने नाबाद 22 धावांची खेळी केली. धावांच्या दृष्टीने ही खेळी छोटी वाटत असली तरी सामन्यातील परिस्थिती पाहात रिंकू मैदानात टिकून राहिला आणि विजयश्री त्याने खेचून आणला हे फार महत्त्वाचं आणि निर्णायक ठरलं.


सामन्यात नक्की घडलं काय?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शेवटच्या ओव्हरमध्ये विजयासाठी 7 धावा हव्या असताना 3 विकेट्स पडल्या. मात्र दुसऱ्या बाजूला रिंकू टिकून राहिला आणि त्याने भारताला विजय मिळवून दिला. शेवटच्या बॉलवर एक धाव हवी होती. त्यावेळी रिंकूबरोबर तळाचा फलंदाज मुकेश कुमार फलंदाजी करत होता. या तणावाच्या स्थितीमध्ये रिंकूने शेवटच्या चेंडूवर षटकार लगावला. हा षटकार ग्राह्य धरण्यात आला नाही. या 6 धावा भारतीय संघाच्या स्कोअरमध्ये मोजण्यात आल्या नाही. चेंडू सीमेपार गेल्यानंतर गोलंदाज एबोटने टाकलेला बॉल हा नो बॉल होता. त्यामुळे तो एक रन ग्राह्य धरुन भारत हा षटकार जाण्याआधीच जिंकल्याने सहा धावा मोजल्या नाहीत.


मी जे आधीपासून करत आलोय तेच...


सामन्यानंतर बीसीसीआयच्या एक्स हॅण्डलवर एक व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. यामध्ये रिंकू सिंह त्याच्या खेळीसंदर्भात बोलताना तणावाच्या स्थितीमध्ये आपण काय विचार करत होतो हे सांगितलं. "आपण सामना जिंकलो हे माझ्यासाठी फार उत्तम आहे. मी फलंदाजीसाठी गेलो तेव्हा माझ्यासाठी ती परिस्थिती फारच उत्तम होती. मी हे फार आधीपासून करत आलो आहे. मला सूर्याबरोबर फलंदाजी करताना छान वाटलं. मी जे आधीपासून करत आलो आहे तेच आपल्याला करायचं आहे, असाच विचार मी करत होतो," असं रिंकू सिंह म्हणाला.


रिंकूनेच सांगितलं धोनी कनेक्शन


तणावाच्या वेळी मन शांत कसं ठेवलं यासंदर्भात विचारलं असता रिंकू सिंहने माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीचा उल्लेख केला. "तणाव जाणवला नाही. माही भाईबरोबर एकदा बोलताना, तुम्ही शेवटच्या ओव्हरमध्ये नेमकं काय करता असं विचारलं होतं. त्याने सांगितलं होतं की, तुम्ही जेवढे शांत राहाल आणि 'मारताना' जेवढं सरळ पाहाल तेवढं उत्तम असतं. मी तेच फॉलो करतो. याचा मला फायदा होतो," असं रिंकू म्हणाला.



तो नो बॉल होता ठाऊक नव्हतं


रिंकूने शेवटचा बॉल हा नो बॉल होता याची कल्पना नव्हती असंही म्हटलं आहे. मला आधी ठाऊक नव्हतं की तो नो बॉल होता. मी ड्रेसिंग रुममध्ये गेल्यानंतर मला याबद्दल समजलं, असं तो म्हणाला. पुढील सर्व सामने आम्हीच जिंकू असा विश्वासही रिंकूने व्यक्त केला.