बंगळुरू : भारताविरुद्धच्या तिसऱ्या वनडे मॅचमध्ये ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकला आहे. कर्णधार एरॉन फिंचने टॉस जिंकून पहिले बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला आहे. या सीरिजच्या तिन्ही मॅचमध्ये विराट कोहलीला टॉसमध्ये पराभूत व्हावं लागलं आहे. पहिल्या दोन वनडे मॅचमध्ये एरॉन फिंचने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला होता, पण यावेळी मात्र एरॉन फिंचने त्याचा निर्णय बदलला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या वनडेवेळी शिखर धवन आणि रोहित शर्माला दुखापत झाली होती, पण हे दोघेही तिसरी वनडे खेळण्यासाठी फिट आहेत. तसंच या मॅचमध्येही केएल राहुलच विकेट कीपिंग करणार आहे. पहिल्या वनडेवेळी ऋषभ पंतला बॅटिंग करत असताना हेल्मेटला बॉल लागला. दुखापत झाल्यामुळे पंत पहिल्या वनडेमध्ये विकेट कीपिंगला आला नव्हता, तसंच दुसऱ्या वनडेमध्येही पंत दुखापतीमुळे खेळू शकला नव्हता. केएल राहुलने या संधीचा फायदा घेतला आणि बॅटिंग करताना तसंच विकेट कीपिंग करतानाही उल्लेखनीय कामगिरी केली.


तिसऱ्या वनडेमध्ये भारत त्याच टीमसोबत उतरला असताना ऑस्ट्रेलियाने मात्र एक बदल केला आहे. फास्ट बॉलर केन रिचर्डसनऐवजी जॉश हेजलवूडला संधी देण्यात आली आहे. 


भारतीय टीम 


शिखर धवन, रोहित शर्मा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल, रविंद्र जडेजा, मोहम्मद शमी, नवदीप सैनी, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह


ऑस्ट्रेलियाची टीम 


एरॉन फिंच, डेव्हिड वॉर्नर, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅबुशेन, एलेक्स कॅरी, एश्टन टर्नर, एश्टन अगर, पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉश हेजलवूड, एडम झम्पा 


मुंबईमध्ये झालेल्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा १० विकेटने दारुण पराभव झाला होता. भारताने ठेवलेलं २५६ रनचं आव्हान ऑस्ट्रेलियाने एकही विकेट न गमावता पूर्ण केलं होतं. ओपनर डेव्हिड वॉर्नर आणि एरॉन फिंच यांनी नाबाद शतकी खेळी केली होती. वनडे क्रिकेटमधला भारताचा हा सगळ्यात मोठा पराभव होता. 


मुंबईतल्या पराभवाचा बदला भारतीय टीमने राजकोटमध्ये घेतला. दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ३५ रननी विजय झाला. शिखर धवन, केएल राहुल आणि विराट कोहलीच्या शतकामुळे भारताने ३४० रनपर्यंत मजल मारली. या आव्हानाचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाचा ३०५ रनवर ऑलआऊट झाला. मोहम्मद शमी, नवदीप सैनी आणि बुमराहचे अचूक यॉर्कर आणि कुलदीप-जडेजा या स्पिनरनी मोक्याच्या क्षणी घेतलेल्या विकेटमुळे भारताने सीरिजमध्ये पुनरागमन केलं.


सीरिज सध्या १-१ने बरोबरीत असल्यामुळे बंगळुरुची वनडे निर्णायक ठरणार आहे. मागच्यावर्षी भारतात झालेल्या वनडे सीरिजमध्ये ऑस्ट्रेलियाचा ३-२ने विजय झाला होता. सीरिजच्या पहिल्या दोन्ही मॅच गमावल्यानंतर ऑस्ट्रेलियाने उरलेल्या तिन्ही मॅच जिंकल्या. बंगळुरूमध्ये होणारी आजची मॅच जिंकली तर ऑस्ट्रेलिया भारतात लागोपाठ २ वनडे सीरिज जिंकेल.