मेलबर्न : भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या तिसऱ्या टेस्ट मॅचला २६ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. ४ टेस्ट मॅचच्या या सीरिजमधली पहिली मॅच भारतानं ३१ रननी जिंकली तर दुसऱ्या मॅचमध्ये भारताचा पराभव झाला. त्यामुळे सीरिज सध्या १-१नं बरोबरीत आहे. तिसऱ्या टेस्ट मॅचमध्ये विजय मिळवणारी टीम या सीरिजमध्ये अजेय आघाडी घेईल. तिसऱ्या टेस्ट आधी भारतीय टीममध्ये ऑल राऊंडर हार्दिक पांड्याची निवड करण्यात आली आहे. दुखापतीतून पांड्या पूर्णपणे सावरल्यामुळे पांड्याला टीममध्ये स्थान देण्यात आलं. पण या टेस्टमध्ये पांड्याच्या खेळण्यावर प्रश्न उपस्थित झाले आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हार्दिक पांड्या हा फिट असला तरी त्याला मॅचचा सराव नसल्याची सावध प्रतिक्रिया भारतीय टीमचे प्रशिक्षक रवी शास्त्रींनी दिली आहे. पांड्या आल्यामुळे आम्हाला पाचव्या बॉलरचा पर्याय मिळाला आहे, पण त्यानं फक्त एक प्रथम श्रेणी मॅच खेळली आहे. एका मॅचवर निर्णय घ्यायच्या आधी आम्हाला सतर्क राहावं लागेल, असं शास्त्री म्हणाले.


हार्दिकची रणजीमध्ये शानदार कामगिरी


हार्दिक पांड्यानं रणजी ट्रॉफीमध्ये बडोद्याकडून खेळताना मुंबईविरुद्ध मॅचमध्ये ७ विकेट घेतल्या आणि अर्धशतकही केलं. पांड्यानं घेतलेल्या ७ विकेटपैकी ५ विकेट या एका इनिंगमध्येच आल्या होत्या.


पांड्याच्या अनुपस्थितीमुळे भारताची अडचण


ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारताला फास्ट बॉलिंग करु शकणाऱ्या ऑलराऊंडरची कमी जाणवत आहे. पर्थच्या दुसऱ्या टेस्टमध्ये भारत ४ फास्ट बॉलर १ विकेट कीपर आणि ६ बॅट्समन घेऊन मैदानात उतरला होता. जर हार्दिक पांड्यासारखा खेळाडू टीममध्ये असता तर भारत ३ फास्ट बॉलर, एक ऑलराऊंडर आणि २ स्पिनर घेऊन मैदनात उतरू शकला असता. यामुळे भारतीय टीममध्ये संतुलन आलं असतं, याचबरोबर बॉलिंगमध्ये वेगळेपणही दिसलं असतं.


पृथ्वी शॉऐवजी मयंक अग्रवालला संधी


भारतीय टीमचा ओपनर पृथ्वी शॉ दुखापतीमुळे संपूर्ण सीरिजला मुकणार आहे. पृथ्वी शॉच्याऐवजी मयंक अग्रवालची भारतीय टीममध्ये निवड करण्यात आली आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया-११ विरुद्धच्या मॅचमध्ये खेळताना पृथ्वी शॉला दुखापत झाली होती. या मॅचमध्ये बाऊंड्रीवर फिल्डिंग करताना शॉच्या पावलाला दुखापत झाली. मेलबर्नमध्ये २६ डिसेंबरपासून सुरु होणाऱ्या तिसऱ्या टेस्टसाठी शॉ फिट होईल, अशी अपेक्षा भारतीय टीमनं व्यक्त केली होती. पण भारतीय टीमची ही अपेक्षा फोल ठरली.


मयंक अग्रवालवर विचार सुरू


भारतीय टीम मयंक अग्रवालचा पर्याय म्हणून विचार करत असल्याचे संकेत रवी शास्त्रींनी दिले आहेत. मयंक एक चांगला खेळाडू आहे. भारत ए कडून खेळताना त्यानं खोऱ्यानं रन काढल्या आहेत. त्याचं रेकॉर्ड बघितलं तर ते कोणत्याही दुसऱ्या खेळाडू एवढंच चांगलं आहे. त्यामुळे मयंकबद्दल आम्हाला निर्णय घ्यावा लागेल, असं शास्त्री म्हणाले.


ओपनर चिंतेचा विषय


भारताचे ओपनर केएल राहुल आणि मुरली विजय यांचा फॉर्म आमच्यासाठी चिंतेचा विषय असल्याचं वक्तव्य शास्त्रींनी केलं आहे. ओपनिंग बॅट्समनना जबाबदारी घेऊन खेळावं लागेल, असा इशारा शास्त्रींनी दिला. त्यांच्याकडे अनुभव असल्यामुळे ते त्यांचं योगदान देतील, असा विश्वास शास्त्रींनी व्यक्त केला.


तिसऱ्या टेस्टसाठी ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये ७ वर्षांच्या चिमुरड्याचा समावेश