द्विशतकी खेळी करत मयांक अग्रवालने रचला इतिहास
त्याने भारतीय संघाचा डाव सावरला
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघातील सलामीवीर मयांक अग्रवाल याने आपल्या कसोटी क्रिकेटच्या कारकिर्दीतील दुसरं द्विशतक ठोकलं आहे. बांगलादेशच्या क्रिकेट संघाविरोधात इंदूर येथील होळकर स्टेडियममध्ये मयांक ही द्विशतकी खेळी खेळला. त्याच्या याच खेळीच्या बळावर भारतीय संघाला सामन्यात आघाडी मिळालीआहे. पुन्हा एकदा संयमी खेळी करणाऱ्या मयांकवर सध्या कौतुकाचा वर्षाव होत आहे.
रोहित शर्मा बाद झाल्यानंतर मयांकने चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांच्या साथीने भारतीय संघाचा डाव सावरला. दोन्ही खेळाडूंसोबत चांगली भागीदारी करत त्याने अर्धशतक, शतक, दीडशे झावा असा खेळ खेळत अखेर द्विशतकी खेळीचा टप्पा पूर्ण केला. २४३ धावा करणारा मयांक या खेळीमध्ये सरासरी ६६.६७च्या स्ट्राईक रेटने तो खेळत होता.
सर्वाधिक कमी खेळीमध्ये द्विशतक झळकवण्याच्या बाबतीत मयांकने सर डॉन ब्रॅडमन यांनाही मागे टाकलं आहे. सर डॉन ब्रॅडमन यांनी १३ खेळीमध्ये दोन द्विशतकी खेळी केली होती. तर, मयांकने १२ खेळींमध्येच ही कमाल करुन दाखवली आहे. असं असलं तरीही या बाबतीतील विश्वविक्रम हा अबाधित असून, तो विनोद कांबळीच्या नावे आहे. ज्याने ५ खेळींमध्ये दोन द्विशतकं झळकावली होती.
मयांकने त्याच्या क्रिकेटच्या कारकिर्दीत आतापर्यंत दोन द्विशतकी खेळी केल्या आहेत. ज्यामध्ये त्याने दक्षिण आफ्रिकेविरोधात आपली पहिली द्विशतकी खेळी दाखवली होती.