Video: `याच्या तर हेल्मेटला...`, पंतचं Stump Mic मधलं विधान ऐकून गावसकरांना हसू अनावर
India vs Bangladesh Kanpur Test Rishabh Pant Video: ऋषभ पंत स्टम्प्स मागून करत असलेले कॉमेंट्री कायमच चर्चेचा विषय ठरत असते. असं असतानाच आता त्याचा नवा व्हिडीओ समोर आला आहे.
India vs Bangladesh Kanpur Test Rishabh Pant Video: भारतीय संघ क्षेत्ररक्षण करत असेल आणि ऋषभ पंत किपर असल्यास वातावरण हसतं खेळतं ठेवण्यासाठी तो करत असलेले प्रयत्न अगदी प्रामुख्याने दिसून येतात. स्टम्प्समागे शांत उभा न राहता पंत सतत काही ना काही बोलताना आणि गोलंदाजांना प्रोत्साहन देताना दिसतो. सध्या बंगलादेशविरुद्ध सुरु असलेल्या कसोटी मालिकेमधील चेन्नईतील पहिल्या कसोटीमध्ये दमदार शतकी खेळी करत ऋषभ पंतने आजरपणातून परत आल्यानंतर कसोटीत दमदार पुनरागमन केलं आहे. कोणत्याही स्थितीमध्ये खेळण्याचं तुफान कौशल्य असलेल्या पंतकडे त्याच्या याच क्षमतेमुळे कसोटीतील मॅच विनर म्हणून पहिलं जातं. एकीकडे त्याच्या फलंदाजीने गोलंदाजांची भंबेरी उडते तर दुसरीकडे स्टम्प्स मागून त्याची सतत सुरु असणारी बडबड सर्वांनाच हसवते. असाच काहीसा प्रकार नुकताच समोर अला असून पंतचं बोलणं ऐकून कॉमेन्ट्री करणाऱ्या सुनील गावसकरांनाही हसू रोखता आलं नाही.
स्वत: लावली फिल्डींग
भारताचे फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि रविंद्र जडेजा या दोघांना प्रोत्साहन देताना पंत स्टम्प्स मागून सल्ले देत असतो. खरं तर पंत केवळ आपल्याच संघातील खेळाडूंना मदत करतो असं नाही. चेन्नईतील कसोटीच्या दुसऱ्या डावात पंतने चक्क बांगलादेशचा कर्णधार नजमुल हुसैन शांतोला स्वत: फलंदाजी करत असताना बांगलादेशच्या संघांची फिल्डींग लावण्यासही मदत केली होती. पंतचा हा मदतीचा स्वभाव कानपूरमधील दुसऱ्या कसोटीतही दिसून आला.
हेल्मेटला बॉल लागला तरी
अश्विन गोलंदाजी करत असताना पंत स्टम्प्स मागे उभा होता आणि शांतो फलंदाजी करत होता. अश्विन शांतोला अखूड टप्प्याचे बॉल टाकत असल्याचं पाहून पंतने त्याला पूर्ण टप्प्याचा म्हणजेच फूल टॉस पद्धतीचा चेंडू टाकण्याचा सल्ला दिला. अश्विनने त्याचं ऐकलं आणि शांतो एलबीडब्ल्यू झाला. पंतचे सल्ले यानंतरही थांबले नाहीत. मोमिनूल हक आणि मुशरफिकूर रहीम भागीदारी करण्याचा प्रयत्न करत असतानाच पंतने एक फारच मजेदार सल्ला दिला. अश्विन सामन्यातील पहिल्या डावातील 33 वी ओव्हर टाकत असताना चेंडू फारच उसळी घेत होता. हा चेंडू मोमिनूल हकच्या हेल्मेटला लागला. हे पाहून पंतने स्टम्प्सच्या जवळपास असलेल्या फिल्डर्सबरोबरच गोलंदाज अश्विनला मोठ्याने म्हणाला, "याच्या (मोमिनूलच्या) तर हेल्मेटला चेंडू लागला तरी आपल्याला एलबीडब्ल्यू मिळू शकतो."
गावसकरांना हसू आवरेनासं झालं
पंतचा हा सल्ला ऐकून कॉमेंट्री करणाऱ्या गावसकरांनाही हसू थांबवता आलं नाही. त्यांनी पंतने केलेली कमेंट ही मोमिनूल हकच्या उंचीबद्दल होती. "पंतला हिंदीत असं म्हणायचं आहे की फलंदाजाच्या हेल्मेटला बॉल लागूनही आपल्याला एलबीडब्ल्यू मिळू शकतं. तो मोमिनूलच्या उंचीबद्दल बोलतोय. हा असा विचार केवळ ऋषभ पंतच करु शकतो," असं गावसकर हसत हसत म्हणाले. हे ऐकून गावसकरांबरोबर कॉमेंट्री करणारा दिनेश कार्तिकही हसू लागला. पंतला असं म्हणतायचं होतं की मोमिनूल हक एवढा बुटका आहे की त्याच्या हेल्मेटला चेंडू लागला तरी तो स्टम्पच्या उंचीपेक्षा खालीच असेल. अनेकांनी हा असा एवढा अपमान आपण क्रिकेटच्या मैदानात यापूर्वी ऐकलेला नाही असं म्हणत पंतच्या विनोदबुद्धीला दाद दिली आहे. काहींनी तर पंतलाच तुझी स्वत:ची उंची केवढीशी आहे तरी असं बोलतोयस असं म्हणत ट्रोल करण्याचा प्रयत्न केलाय. तुम्हीच पाहा हा व्हिडीओ
दीड दिवस पावसात गेला
कानपूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पावसामुळे पूर्ण दिवसाचा खेळ झाला नाही. केवळ 35 षटकांचा सामना झाला. बंगलादेशचा संघ 107 वर 3 गडी बाद अशा स्थितीमध्ये असून शनिवारी दुसऱ्या दिवशीचा खेळही पावसामुळे रद्द करण्यात आला. दुसऱ्या दिवशी खेळाडूंना मैदानावर उतरताच आलं नाही.