मुंबई : टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवींद्र जडेजा संध्या चांगलाच फॉर्ममध्ये आहे. इंग्लंडविरूद्धच्या कसोटी सामन्यातील टीम इंडियाच्या पहिल्या डावात रवींद्र जडेजाने तुफान फटकेबाजी करत सेंच्यूरी ठोकली. या सेंच्यूरीनंतर त्याच्या खेळीचे कौतूक होत आहे. या खेळीसंदर्भात दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर माध्यमांशी बोलताना रवींद्र जडेजाने अनेक प्रश्नांवर उत्तर दिली. आयपीएल वादावर ही त्याने थेट प्रतिक्रिया दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 इंग्लंड विरूद्ध सामन्यात रवींद्र जडेजाने 104 धावा करत शतक ठोकलं. आयपीएलमधील निराशाजनक कामगिरीनंतर त्याच्या बॅटीतून आलेले हे शतक खुप महत्वपुर्ण आहे. या खेळीवर इंग्लंडच्या माध्य़मांशी बोलताना रवींद्र जडेजा म्हणाला की, भारताबाहेर विशेषत: इंग्लंडमध्ये चांगली कामगिरी करणे खूप चांगले वाटतेय. एक खेळाडू म्हणून 100 धावा करणे ही मोठी गोष्ट आहे. खासकरून इंग्लंडच्या मैदानावर १०० धावा केल्यानंतर मी एक खेळाडू म्हणून स्वत:वर आत्मविश्वास बाळगू शकतो,असे  तो म्हणालाय.  


'त्या' धावा बोनस होता


रवींद्र जडेजा पुढे म्हणतो की,  'आमचे 9व्या, 10व्या आणि 11व्या क्रमांकाचे खेळाडू फलंदाजीचा खूप सराव करतात. आमचे संघ व्यवस्थापन सराव सत्रांमध्ये त्यांच्या फलंदाजीवर काम करेल याची खात्री करून घेते.जेव्हा 9व्या, 10व्या आणि 11व्या क्रमांकाचे फलंदाज धावा करतात तेव्हा ते चांगले वाटते, कारण तो संघासाठी बोनस असतो. बुमराह जेव्हा नेटवर फलंदाजी करतो तेव्हा तो गांभीर्याने घेतो. त्याने इतर फलंदाजांसह केलेल्या शेवटच्या 40-50 धावा हा बोनस होता, असे जडेजा म्हणालाय. 


आयपीएलमधील कर्णधारपदाच्या वादावर जडेजा स्पष्टचं बोलला. मी या घटनेपासून पुढे आलो आहे. त्याचवेळी त्याचे संपूर्ण लक्ष भारतासाठी खेळणे आणि चांगली कामगिरी करण्यावर असल्याचे त्याने स्पष्ट केले. 


जडेजा पुढे म्हणतो, 'जे काही झाले ते झाले. आयपीएलबाबत माझ्या मनात नव्हते. जेव्हा तुम्ही भारतासाठी खेळता तेव्हा तुमचे संपूर्ण लक्ष भारतीय संघावर असले पाहिजे. माझ्यासाठी तेच होते, भारतासाठी चांगली कामगिरी करण्यापेक्षा दुसरे समाधान नाही, असेही तो म्हणालाय. 


नेमका वाद काय?
जडेजासाठी आयपीएलचा 15वा सीझन खूपच निराशाजनक होता. या सीझनमध्ये धोनीने कर्णधारपद सोडण्याचा निर्णय घेतल्याने चेन्नई सुपर किंग्स (CSK) ने रवींद्र जडेजाला कर्णधार बनवले होते.पण जडेजा कर्णधारपदात फार काही कमाल दाखवू शकला नाही. त्यामुळे तो कर्णधार पदावरून पायउतार झाला. यामुळे एमएस धोनीने पुन्हा कर्णधारपदाची जबाबदारी स्वीकारली. नंतर जडेजा दुखापतीमुळे उर्वरित सामन्यातून बाहेर पडला होता. त्यामुळे जडेजावर खुप टीको होत होती.