विजयानंतर गांगुलीची खोचक प्रतिक्रिया! द्रविडचं जशास तसं उत्तर; म्हणाला, `मी काही त्यातला..`
India vs England Test Match Sourav Ganguly Vs Rahul Dravid: भारताने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील दुसरा सामना जिंकल्यानंतर गांगुलीने नोंदवलेल्या प्रतिक्रियेसंदर्भात प्रशिक्षक राहुल द्रविडला विचारण्यात आलं होतं.
India vs England Test Match Sourav Ganguly Vs Rahul Dravid: भारतीय क्रिकेट संघाने इंग्लंडविरुद्धची दुसरा कसोटी सामना मोठ्या फरकाने जिंकला. या विजयसहीत भारताने मालिकेमध्ये 1-1 ची बरोबर केली आहे. 5 सामन्यांच्या या मालिकेमधील पहिला सामना इंग्लंडने जिंकला होता. त्यामुळेच दुसरा सामना जिंकण्याचा दबाव भारतीय संघावर होता. मात्र भारतीय संघाने उत्तम कामगिरी करत विजय मिळवला. विशाखापट्टनममधील कसोटीमध्ये भारतीय संघाला विजय मिळाल्यानंतर भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने सोशल मीडियावर असं काही म्हटलं की त्यावरुन वाद झाला. प्रशिक्षक राहुल द्रविडने या विधानावर आपली तिखट प्रतिक्रिया नोंदवली आहे.
सामन्यात घडलं काय?
इंग्लंडविरुद्धच्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेमध्ये भारताने 1-1 ची बरोबरी केली. पुढील 3 सामन्यांमध्ये जो संघ सर्वाधिक सामने जिंकणार चषक त्या संघाला मिळणार. कोणत्याही परिस्थितीमध्ये मालिका बरोबरीत सोडवण्याचा भारताचा विचार नसून मालिका जिंकण्याच्या इराद्यानेच रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ मैदानात उतरेल हे निश्चित आहे. हैदराबादमधील पराभवानंतर भारताने दुसरा सामना 106 धावांनी जिंकला. या विजयानंतर माजी कर्णधार सौरव गांगुलीने सोशल मीडियावर भारतीय गोलंदाजांचं कौतुक करताना असं काहीतरी लिहिलं की त्यावरुन मतभेद झाले.
गांगुली नेमकं काय म्हणाला?
"मी जेव्हा बुमराह, सिराज आणि मुकेश कुमार यांना गोलंदाजी करताना पाहतो तेव्हा विचार करतो की भारतामध्ये आपल्याला फिरकीला साथ देणाऱ्या खेळपट्ट्या तयार करण्याची काय गरज आहे असा प्रश्न पडतो. चांगल्या खेळपट्टीवर सामना खेळवण्याची माझी इच्छा प्रत्येक सामन्यागणीक अधिक दृढ होत आहे. हे गोलंदाज कोणत्याही खेळपट्टीवर तुमच्यासाठी 20 विकेट्स काढू शकतात. त्यांना कुलदीप आणि अक्षरसारख्या गोलंदाजांची मदत हवी. घरगुती मैदानावर ज्या पद्धतीच्या खेळपट्ट्या असतात त्या पाहूनच मागील 6 ते 7 वर्षांमध्ये फलंदाजीचा दर्जा घसरला आहे. खेळपट्टी चांगली असणे फार महत्त्वाचे असते," असं गांगुली एक्स अकाऊंटवरुन म्हणाला.
द्रविडचं उत्तर
गांगुलीने केलेल्या या विधानावर दुसऱ्या कसोटीनंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राहुल द्रविडने प्रतिक्रिया नोंदवली. "क्युरेटर खेळपटट्टी तयार करतात. आम्ही तशा खेळपट्टीची मागणी करत नाही. भारतीय खेळपट्ट्यांवर चेंडू वळणार हे सहाजिक आहे. मी काही त्यातला तज्ज्ञ नाही. तरी चेंडू किती वळेल हे ही महत्त्वाचं असतं. भारतामध्ये चौथ्या किंवा पाचव्या दिवशी फिरकीपटूंना मदत मिळते," असं द्रविड म्हणाला.