`मी क्रिकेटर नंतर आहे, आधी...`, जेम्स अँडरसनशी तुलना केल्यानंतर बुमराहचं मन जिंकणारं उत्तर
Jasprit Bumrah on James Anderson: इंग्लंडविरोधातील दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचा धुव्वा उडवणारा जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) सध्या फक्त भारत नव्हे तर जगभरातील क्रिकेट चाहत्यांमध्ये चर्चेचा विषय आहे.
Jasprit Bumrah on James Anderson: इंग्लंडविरोधातील दुसऱ्या सामन्यात फलंदाजांचा धुव्वा उडवणारा भारतीय गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याने जगभरातील क्रिकेट चाहत्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. विशाखापट्टणममधील सामन्यात जसप्रीत बुमरहाने दोन्ही डावात एकूण 9 विकेट घेत भारतीय संघाच्या विजयाचा पाया रचला. आपल्या जबरदस्त कामगिरीने त्याने द्विशतक ठोकणाऱ्या यशस्वी जयस्वाललाही माग टाकलं आणि सामनावीर पुरस्कार मिळवला. सामन्यानंतर बुमराहला त्याने पहिल्या डावात ओली पोपला बाद करण्यासाठी टाकलेल्या यॉर्करची आठवण करुन दिली. समालोचक हर्षा भोगले यांनी बुमराहला सध्या वकार युनिसही तुझ्याबद्दल चर्चा करत आहे असं सांगितल्यानंतर त्याने एक चांगलं उत्तर दिलं. त्याचं हे उत्तर क्रिकेट चाहत्यांचं मन जिंकत आहे.
चर्चेच्या सुरुवातीला बुमराहला उपखंडातील खेळपट्ट्या फिरकीपटूंना अधिक अनुकूल असतानाही भारतातील त्याच्या आश्चर्यकारक आकडेवारीबद्दल माहिती देण्यात आली. त्यावर उत्तर देताना बुमरहाने आपल्याला आकड्यांची फार चिंता नसल्याचं सांगितलं. "मी आधी म्हटलं त्याप्रमाणे मी आकड्यांकडे पाहत नाही. एक तरुण खेळाडू म्हणून मी हे करतो आणि हे मला उत्साही बनवतं. पण आता ते अतिरिक्त ओझं ठरतंय," असं बुमराहने सांगितलं.
हर्षा भोगले यांनी यावेळी बुमराहला संपूर्ण जग तुझ्या यॉर्करची चर्चा करत असल्याची माहिती दिली. त्यावर तो म्हणाला की "मी तरुणपणी सर्वात आधी यॉर्कर टाकायला शिकलो. मी खेळातील अनेक महान खेळाडूंना पाहिलं आहे. वकार, वसीम आणि झहीर खान यांना पाहिलं आहे".
"आपण आता मोठ्या बदलातून जात असून, शक्य त्या पद्धतीने त्यांना मदत करणं माझी जबाबदारी आहे. आम्ही काही गोष्टींवर चर्चा करतो. मी रोहित शर्मासह बराच काळापासून खेळत आहे," असं बुमराह म्हणाला.
दरम्यान यावेळी बुमराहला जेम्स अँडरसन असणाऱ्या स्पर्धेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर बुमराहने पुन्हा एकदा मन जिंकणारं उत्तर दिलं. "नाही मी जेम्स अँडरसनह स्पर्धा असल्याचं मानत नाही. मी क्रिकेटर असण्याआधी जलद गोलंदाजीचा चाहता आहे. जर एखादा चांगला खेळत असेल तर त्याचं कौतुक आहे. मी स्थिती पाहतो, विकेट पाहतो आणि माझ्याकडे काय पर्याय आहेत याचा विचार करतो," असं बुमराह म्हणाला.
इंग्लिश मीडियाने बुमराहच्या कामगिरीवर काय म्हटलं?
The Telegraph: T20 क्रिकेटने जगाला जसप्रीत बुमराहसारखा सर्वोत्तम कसोटी गोलंदाज दिला आहे. बुमराह लसिथ मलिंगासोबत शिकला आणि कसोटी क्रिकेटमध्ये त्याच्या कौशल्याचा वापर केला.
Independent UK: बुमराह हा खेळातील एक दिग्गज आहे आणि निर्विवादपणे भारताने तयार केलेला महान वेगवान गोलंदाज आहे. सीम बॉलिंग ही एक कला आहे आणि भारतीय खेळपट्ट्यांवर त्यातून जादू करणं अजून कठीण आहे.
The Daily Mail: डोंगर चढण्यासाठी खूप मोठा असतानाही जसप्रीत बुमराहने त्याच्या जागतिक दर्जाच्या, रिव्हर्स स्विंगच्या सहाय्याने सहा विकेट्समध्ये आणखी तीन विकेट्स जोडल्या.