`तुम्हाला जो पैसा, प्रसिद्धी...`, रोहित शर्माच्या `त्या` विधानावर गावसकर स्पष्टच बोलले
India vs England Test: ज्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवायचीच नाही, अशा खेळाडूंचा संघ व्यवस्थापन विचार करणार नाही. जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे अशा शब्दांत रोहित शर्माने (Rohit Sharma) कडक इशारा दिला आहे.
India vs England Test: भारतीय संघाचे माजी फलंदाज लिटिल मास्टर सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या विधानावर पूर्ण सहमती दर्शवली आहे. जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे अशा शब्दांत रोहित शर्माने (Rohit Sharma) संघातील खेळाडूंना कडक इशारा दिला आहे. रांचीमध्ये इंग्लंडचा पराभव केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रोहित शर्माला सध्या सुरु असलेल्या आयपीएल विरुद्ध कसोटी या चर्चेबद्दल विचारण्यात आलं. त्यावर त्याने तात्काळ उत्तर देत कसोटी सर्वात कठीण प्रकार असून, ज्यांच्यात जिंकण्याची भूक नाही असा खेळाडूंना तात्काळ ओळखता येतं असं उत्तर दिलं. सुनील गावसकर यांनी रोहित शर्माच्या विधानावर सहमती दर्शवता खेळाडूंना क्रिकेटप्रती आपली निष्ठा दाखवली पाहिजे असं म्हटलं आहे.
"तो एकदम बरोबर आहे. जे कसोटी क्रिकेट खेळू इच्छित आहेत, त्यांना पाहा. मी कित्येक वर्षं हेच बोलत आहे. खेळाडू आज जे काही आहेत ते भारतीय क्रिकेटमुळेच आहेत. आत आयुष्यात आणि करिअरमध्ये त्यांनी जी उंची गाठली आहे ती भारतीय क्रिकेटमुळेच आहे. पैसे, प्रसिद्धी आणि ओळख त्यांना भारतीय क्रिकेटशिवाय मिळाली नसती. त्यामुळे तुम्हाला क्रिकेटप्रती निष्ठा दाखवणं गरजेचं आहे," असं सुनील गावसकर म्हणाले आहेत.
"आणि जर तुम्ही काही कारणास्तव ती निष्ठा दाखवू शकला नाही आणि मी हे खेळणार नाही, ते खेळणार नाही असं म्हणत असाल तर रोहितचं म्हणणं बरोबर आहे. ज्यांच्यात भूक आहे, ज्यांच्या मेहनत घेण्याची इच्छा आहे त्यांनाच यापुढे संधी दिली जाईल या त्याच्या म्हणण्याशी मी सहमत आहे. जर निवडकर्त्यांनी ही भूमिका घेतली असेल तर ती भारतीय क्रिकेटसाठी चांगली आहे. अनेक खेळाडूंची निवड होताना आपण पाहिलं असून, तसं होता कामा नये," असं गावसकरांनी सांगितलं आहे.
रोहित शर्मा नेमकं काय म्हणाला आहे?
रांचीमध्ये इंग्लंडचा पराभव केल्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत रोहित शर्माने केलेलं विधान चर्चेत असून, भारतीय खेळाडूंसाठी हा इशाराच आहे.
"कसोटीसारख्या कठीण प्रकारात सहजासहजी संधी मिळत नाही. यशासाठी जे खेळाडू भुकेलेले असतात त्यांच्यासाठी संधी वाट बघत असते. ज्या खेळाडूंना आपली कामगिरी दाखवायचीच नाही, अशा खेळाडूंचा संघ व्यवस्थापन विचार करणार नाही. जर खेळाडूंमध्ये यशाची भूक नसेल तर त्यांना संघात घेऊन काय करायचे," असं रोहित शर्मा म्हणाला आहे.
"ज्या खेळाडूत यशाची भूक नाही, तो मला संघात नको. जे संघात आहेत, नाहीत त्या सर्वांनी याकडे गांभीर्याने पाहावं. कसोटी क्रिकेटमध्ये फार कमी संधी मिळतात. त्यात मिळालेल्या संधीचा फायदा घ्यायचा नसेल तर संघापासून दूर राहा. कसोटीत खेळण्यासाठी तुम्हाला झोकून द्यावं लागतं. संधी मिळाल्यानंतर ती टिकवण्यासठी काहीच प्रयत्न केले नाहीत तर काही उपयोग नाही. येथे तुम्हाला खेळावंच लागतं," असं कडक शब्दांत त्याने सांगितलं आहे.