सेंच्युरीसाठी तरसतोय कोहली, सचिनचा वर्ल्ड रेकॉर्ड तोडणार का ?
विराट कोहली सध्या सेंच्युरीची वाट पाहतोय
मुंबई :भारतीय कर्णधार विराट कोहली (Virat Kohli)एकदिवसीय सामन्यात चांगली धावसंख्या नोंदवतोय. पण अलीकडच्या काळात तो या डावांना सेंच्युरीमध्ये बदलू शकलेला नाही. माजी फलंदाज सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar)एकदिवसीय सामन्यातील 49 शतकांपासून कोहली 6 शतकं दूर आहे. कोहलीने आतापर्यंत 43 शतके केली आहेत. त्याने याआधीचं शतक वेस्ट इंडिजविरुद्ध त्रिनिदादमध्ये 14 ऑगस्ट 2019 रोजी नाबाद 114 धावा करुन नोंदवलं. त्यानंतर आतापर्यंत त्याने एकदिवसीय सामन्यात शतक ठोकलेले नाही.
मात्र कोहलीची (Virat Kohli) सरासरी 45.85 आहे. या काळात त्याने 14 डावात 8 अर्धशतके झळकावली आहेत. तो अनेक वेळा शतकाच्या जवळ पोहोचला पण शतकासाठी हुकला.
इंग्लंडविरुद्धच्या दुसर्या सामन्यात कोहलीने 66 धावा केल्या आणि वनडेमध्ये सलग चार अर्धशतके पूर्ण केली. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या वनडे सामन्यात त्याने 56 धावा केल्या. यापूर्वी ऑस्ट्रेलिया दौर्यावर त्याने 89 आणि 63 धावा केल्या होत्या.
1 जानेवारी 2019 ते 12 ऑगस्ट 2019 या कालावधीत कोहलीने 22 डावात पाच शतके ठोकली होती आणि त्यावेळी असे वाटले की लवकरच तो एकदिवसीय मालिकेत सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar)च्या विक्रमला मागे टाकेल.
यापूर्वी 2018 वर्षात कोहलीने 14 सामन्यात 6 शतके ठोकली होती. त्याने 2017 मध्ये 26 एकदिवसीय सामन्यात 6 शतके आणि 2016 मध्ये 10 डावांमध्ये तीन शतके केली.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये नोव्हेंबर 2019 नंतर कोहली एकही शतक ठोकण्यात अपयशी ठरलाय. त्याने गुलाबी बॉलने खेळताना बांगलादेशविरुद्ध शतक ठोकले. ऑस्ट्रेलियाचा माजी फलंदाज रिकी पॉन्टिंग नंतर 10,000 पेक्षा जास्त धावा करणारा कोहली दुसरा खेळाडू ठरला.