ठरलं तर! आयर्लंड विरूद्ध सामन्यात उमरान मलिकचा डेब्यू
सर्व भारतीय चाहत्यांना याची उत्सुकता लागली आहे.
मुंबई : भारत आणि आयर्लंड यांच्यातील दोन सामन्यांच्या T20 मालिकेतील पहिला सामना आज रात्री 9 वाजता डब्लिन येथे खेळवला जाणार आहे. या मालिकेसाठी टीम इंडियाची कमान हार्दिक पांड्याकडे असणार आहे. या सामन्यात युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकला संधी मिळणार आहे. त्यामुळे सर्व भारतीय चाहत्यांना याची उत्सुकता लागली आहे.
दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुकत्याच संपलेल्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेत टीम इंडियाचा युवा खेळाडू उमरान मलिक पदार्पणासाठी उत्सुक होता. मात्र त्याला संपुर्ण मालिका बेंचवर बसवून ठेवले होते. टीम इंडियामध्ये निवड होऊनही या खेळाडूला प्लेइंग इलेव्हनमध्ये का संधी मिळत नाही, असा प्रश्न पडलाय. दरम्यान आज हार्दिक पांड्या या खेळाडूला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यात पदार्पणाची संधी देणार असल्याचे स्पष्ट होत आहे.
बीसीसीआयने ट्विट करत उमरान मलिकच्या डेब्युची घोषणा केली आहे. वेगवान गोलंदाज भूवनेश्वर कुमार यांच्या हस्ते कॅप देऊन उमरान मलिकचे टीम इंडीयात स्वागत करण्यात आले. त्याला 98 नंबरची कॅप देऊन त्याचे संघात स्वागत केले गेले.
आयपीएल कामगिरी
उमरान मलिकबद्दल सांगायचे झाले तर, तो ताशी 150 किलोमीटर वेगाने गोलंदाजी करण्यात माहीर आहे. उमरान मलिकने सनरायझर्स हैदराबादकडून आयपीएल 2022 च्या 14 सामन्यांत 22 विकेट घेतल्या. यादरम्यान त्याने चार आणि एकदा पाच विकेट्स घेण्याचा पराक्रमही केला. आयपीएलच्या 15 व्या मोसमात त्याची धारदार गोलंदाजी पाहून प्रत्येकजण त्याला प्लेइंग इलेव्हनमध्ये समाविष्ट करण्याची मागणी करत आहेत.