IND vs NZ TEST : वर्ल्ड चॅम्पियन न्यूझीलंडविरुद्ध पहिला सामना, अशी असेल टीम इंडियाची रणनिती
भारतासाठी ही मालिक सोपी नसणार, महत्त्वाचे सहा खेळाडू संघात नाहीत
मुंबई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील (India vs New Zealand Test Series) पहिला सामना उद्यापासून कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर (Kanpur Green Park Stadium) खेळवला जाणार आहे. जूनमध्ये वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC) फायनलनंतर दोघांमधील हा पहिलाच कसोटी सामना आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनलमध्ये न्यूझीलंडने भारताचा 8 गडी राखून पराभव करून विजेतेपद पटकावलं होतं.
दोन्ही संघांसाठी महत्त्वाची मालिका
आगामी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या दृष्टीने ही कसोटी मालिका दोन्ही संघांसाठी खूप महत्त्वाची ठरणार आहे. इंग्लंडविरुद्धच्या (England) पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारतीय संघाने 2-1 अशी आघाडी घेतल्याने WTC क्रमवारीत भारत सध्या अव्वल स्थानावर आहे. पुढील वर्षी पाचवा कसोटी सामना खेळवला जाणार आहे. तर WTC फायनलनंतर न्यूझीलंडची ही पहिलीच कसोटी मालिका आहे. नुकत्याच झालेल्या टी20 विश्वचषक (T20 World Cup) स्पर्धेत किवी संघाने अंतिम फेरीत धडक मारली होती.
भारत-न्यूझीलंड आकडेवारी
आकडेवारी पाहिली तर, भारत आणि न्यूझीलंड कसोटीत आतापर्यंत 60 वेळा आमनेसामने आले आहेत. यापैकी भारताने 21 कसोटी सामने जिंकले आहेत, तर न्यूझीलंडने 13 कसोटी सामने जिंकले आहेत. त्याचबरोबर 26 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. दोन्ही संघांमध्ये भारतात 34 कसोटी सामने खेळले गेले आहेत. यापैकी भारताने 16 तर न्यूझीलंडने 2 कसोटी सामने जिंकले आहेत. 16 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. कानपूरच्या ग्रीन पार्कमध्ये दोन्ही संघ तीनदा आमनेसामने आले आहेत. यातील दोन सामन्यांत भारताने न्यूझीलंडचा पराभव केला आहे.
कानपूरमध्ये भारताचा रेकॉर्ड
भारतीय संघ कानपूरमध्ये आतापर्यंत 22 कसोटी सामने खेळला आहे. यामध्ये सात सामने जिंकले असून तीन सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. 12 कसोटी सामने अनिर्णित राहिले आहेत. पण ही कसोटी मालिका भारतासाठी इतकी सोपी असणार नाही. कारण संघात सहा महत्त्वाचे खेळाडू नाहीत. यामध्ये विराट कोहली (फक्त पहिली कसोटी), रोहित शर्मा, केएल राहुल, ऋषभ पंत, मोहम्मद शमी आणि जसप्रीत बुमराह यांचा समावेश आहे. विराटच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटीत अजिंक्य रहाणे संघाचं नेतृत्व करेल. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने पाच कसोटी सामने खेळले असून चार जिंकले आहेत. एक सामना अनिर्णित राहिला आहे.
पूजारा-राहणेचा खराब फॉर्म
अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि अजिंक्य रहाणे यांचा खराब फॉर्म ही टीम इंडियासमोरची सर्वात मोठी समस्या आहे. पुजाराला आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतक झळकावून तब्बल 1055 दिवस झाले आहेत. त्याने शेवटचं कसोटी शतक 3 जानेवारी 2019 रोजी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सिडनी इथं झळकावलं होतं. त्यावेळी त्याने 193 धावांची सर्वोत्तम खेळी केली होती. दुसरीकडे रहाणेने डिसेंबर 2020 मध्ये मेलबर्न इथं झालेल्या बॉक्सिंग डे कसोटीत ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचं शतक झळकावले होते. तेव्हापासून तो आऊट ऑफ फॉर्म आहे.
भारत तीन स्पिनर्स खेळवणार?
पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडिया पाच गोलंदाजांसह उतरण्याची शक्यता आहे. यात तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांचा समावेश असेल. फिरकीपटूंमध्ये रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश असू शकतो. टीम इंडियासाठी चांगली गोष्ट म्हणजे तिन्ही फिरकीपटू फलंदाजीही करू शकतात. वेगवान गोलंदाजांमध्ये मोहम्मद सिराज, इशांत शर्मा आणि उमेश यादव यापैकी कोणतेही दोन निवडू शकतात. तिन्ही वेगवान गोलंदाज रिव्हर्स स्विंग करण्यात पटाईत आहेत.
न्यूझीलंडची तगडी टीम
न्यूझीलंडच्या संघाबद्दल बोलायचं झालं तर केन विल्यमसनच्या पुनरागमनाने संघ मजबूत झाला आहे. तीन सामन्यांच्या T20I मालिकेतून त्याने विश्रांती घेतली होती. कर्णधार विल्यमसनने यावर्षी तीन कसोटी सामने खेळले असून 88.25 च्या सरासरीने 353 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि एका अर्धशतकाचा समावेश आहे. पण किवी संघाला डावखुरा फलंदाज डेव्हन कॉनवे याची नक्कीच उणीव भासणार आहे. कॉनवेने 2021 मध्ये तीन कसोटीत 63.16 च्या सरासरीने 379 धावा केल्या आहेत. यामध्ये एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे.
काय असणार किवींची रणनिती
किवी संघही तीन फिरकीपटू आणि दोन वेगवान गोलंदाजांसह मैदानात उतरु शकतो. फिरकीपटूंमध्ये मिचेल सँटनर, एजाज पटेल आणि विल सोमरविले यांचा समावेश प्लेइंग-11 मध्ये होऊ शकतो. त्याचवेळी वेगवान गोलंदाजांमध्ये नील वॅगनर आणि काईल जेमिसन यांना संधि दिली जाऊ शकते.