INDvsNZ: भारताची तुफान फटकेबाजी, पहिल्या टी-२०मध्ये दणदणीत विजय
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला आहे.
ऑकलंड : न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या टी-२० मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला आहे. न्यूझीलंडने दिलेल्या २०४ रनचं आव्हान भारताने १ ओव्हर शिल्लक असतानाच पूर्ण केलं. श्रेयस अय्यरने २९ बॉलमध्ये नाबाद ५८ रनची खेळी केली. न्यूझीलंडच्या मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची सुरुवात खराब झाली. ओपनर रोहित शर्मा फक्त ७ रन करुन माघारी परतला. यानंतर केएल राहुल आणि कर्णधार विराट कोहलीने फटकेबाजी सुरुच ठेवली.
केएल राहुलने २७ बॉलमध्ये ५६ रन आणि विराट कोहलीने ३२ बॉलमध्ये ४५ रन केले. शिवम दुबे ९ बॉलमध्ये १३ रन करुन आऊट झाला, तर मनिष पांडे १२ बॉलमध्ये १४ रनवर नाबाद राहिला. न्यूझीलंडच्या इश सोदीने सर्वाधिक २ विकेट घेतल्या तर मिचेल सॅन्टनर आणि ब्लेयर टिकनरला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.
या मॅचमध्ये भारताचा कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून पहिले फिल्डिंगचा निर्णय घेतला, पण भारतीय बॉलरना फारसा प्रभाव पाडता आला नाही. मार्टिन गप्टील आणि कॉलिन मुन्रोने न्यूझीलंडला ८ ओव्हरमध्येच ८० रनची ओपनिंग पार्टनरशीप करुन दिली. गप्टील १९ बॉलमध्ये ३० रन करुन आऊट झाला, तर कॉलिन मुन्रोने ४२ बॉलमध्ये सर्वाधिक ५९ रन केले.
गप्टील आणि कॉलिन मुन्रोची विकेट गेल्यानंतर बॅटिंगला आलेला कॉलिन डि ग्रॅण्डहोम शून्य रनवर आऊट झाला. पण यानंतरही न्यूझीलंडने भारतीय बॉलरवरचं आक्रमण सुरुच ठेवलं. कर्णधार केन विलियमसनने २६ बॉलमध्ये ५१ रन आणि रॉस टेलरने २७ बॉलमध्ये नाबाद ५४ रन केले. भारताकडून बुमराह सगळ्यात यशस्वी बॉलर ठरला. बुमराहने ४ ओव्हरमध्ये ३१ रन देऊन १ विकेट घेतली. तर शार्दुल ठाकूर, युझवेंद्र चहल, शिवम दुबे आणि रवींद्र जडेजाला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली. न्यूझीलंडच्या बॅट्समननी शार्दुल ठाकूर आणि मोहम्मद शमीचा समाचार घेतला. शार्दुलने ३ ओव्हरमध्ये ४४ रन आणि शमीने ४ ओव्हरमध्ये ५३ रन दिले.
५ टी-२० मॅचच्या या सीरिजमध्ये भारताने १-०ने आघाडी घेतली आहे. या सीरिजची दुसरी टी-२० मॅच रविवार २६ जानेवारीला याच मैदानात होणार आहे.