माऊंट मांगनुई : भारत आणि न्यूझीलंड यांच्यातली तिसरी वनडे मंगळवारी खेळवण्यात येणार आहे. पहिल्या दोन्ही वनडे जिंकून न्यूझीलंडने सीरिज आधीच खिशात टाकली आहे. आता तिसऱ्या मॅचसाठी न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनचं टीममध्ये पुनरागमन झालं आहे. दुसरीकडे ईश सोदी आणि ब्लेयर टीकनर यांनाही न्यूझीलंडने टीममध्ये परत बोलावलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

खांद्याला दुखापत झाल्यामुळे केन विलियमसन पहिल्या २ वनडेमधून बाहेर होता. या दुखापतीमुळे विलियमसनला शेवटच्या २ टी-२० मॅचही खेळता आल्या नाहीत. टी-२० मॅचमध्ये विलियमसनऐवजी टीम साऊदीने न्यूझीलंडच्या टीमचं नेतृत्व केलं, तर वनडे सीरिजसाठी टॉम लेथमला कर्णधार बनवण्यात आलं.


टी-२० सीरिजमध्ये केन विलियमसन शानदार फॉर्ममध्ये होता. पहिल्या २ मॅचमध्ये अर्धशतक केल्यानंतर विलियमसनने तिसऱ्या मॅचमध्ये ९५ रनची खेळी केली. टी-२० सीरिजमध्ये न्यूझीलंडचा ५-०ने पराभव झाला होता.


ईश सोदीने पाचही टी-२० मॅच आणि पहिली वनडे खेळली होती. टी-२० सीरिजमध्ये सोदीने ५ विकेट घेतल्या, तर पहिल्या वनडेमध्ये त्याला २७ रन देऊन १ विकेट मिळाली.


ईश सोदी आणि ब्लेयर टीकनरला न्यूझीलंड ए आणि भारत ए या मॅचसाठी सोडून देण्यात आलं होतं. न्यूझीलंडच्या टीममध्ये असलेले टीम साऊदी, स्कॉट कुगलाईन आणि मिचेल सॅन्टनर आजारी पडले. ताप असतानाही टीम साऊदी दुसरी वनडे खेळला. हे तिन्ही खेळाडू आजारी असल्यामुळे न्यूझीलंडने ईश सोदी आणि ब्लेयर टीकनरला टीममध्ये परत बोलावलं.