पुणे : भारत विरुद्ध न्यूझिलंड यांच्यात आज दुसरा सामना रंगणार आहे.  पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवानंतर भारतीय संघावर दुसरा एकदिवसीय सामना जिंकण्याचं आव्हान असणार आहे. गहुंजे येथील मैदानावर हा सामना होणार आहे. मालिका वाचवण्यासाठी भारतीय संघाला सामना जिंकावाच लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझिलंडने मुंबई येथे झालेल्या पहिल्या सामन्यात सहा गडी राखून भारतावर मात केली होती आणि मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध घरच्या मैदानावर ४-१ ने मालिका जिंकली होती. २०१६ नंतर भारताचा हा सलग सहावा मालिका विजय होता. आता मात्र भारतीय संघाने आजचा सामना गमावला तर विजयाची मालिका खंडित होईल.


पहिल्या सामन्यात कर्णधार विराट कोहलीच्या विक्रमी शतकानंतरही भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता. विराटने फलंदाजांकडून अजून धावांची अपेक्षा व्यक्त केली होती. सलामीवीर रोहित शर्मा आणि शिखर धवन स्वस्तात माघारी परतले. त्यामुळे संघाला चांगली सुरूवात मिळाली नाही. विराट वगळता एकाही फलंदाजाला चांगला स्कोर करता आला नाही. महेंद्रसिंह धोनी, हार्दिक पांड्या, केदार जाधव, दिनेश कार्तिक यांच्याकडून आज धावांची अपेक्षा असणार आहे.


भारतीय संघ - विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, शिखर धवन, अजिंक्य रहाणे, मनीष पांडे, केदार जाधव, दिनेश कार्तिक, एमएस धोनी, हार्दिक पांडय़ा, अक्षर पटेल, कुलदीप यादक, युझवेंद्र चहल, जसप्रीत भुमराह,  भुकनेश्वर कुमार आणि शार्दुल ठाकूर.


न्यूझिलंड संघ - केन विलियम्सन (कर्णधार), मार्टिन गुप्टिल, कोलिन मुनरो,  रॉस टेलर, मैट हेनरी, टॉम लाथम, हेनरी निकोल्स, एडम मिल्ने, ग्लेन फिलिप्स, ट्रेंट बोल्ट, कोलीन डे ग्रांडहोम, मिशेल सेंटनेर, टिम साउदी, जार्ज वर्कर आणि ईश सोढी.