मुंबई : टी 20 वर्ल्ड कपनंतर टीम इंडिया न्यूझीलंड विरुद्ध टी 20 आणि कसोटी मालिका खेळणार आहे. टी 20 मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा करण्यात आली आहे. विराट कोहलीनंतर अपेक्षेप्रमाणे टीम इंडियाच्या कर्णधारपदी रोहित शर्माची नियुक्ती करण्यात आली. तसेच 16 सदस्यीय संघ जाहीर केला. या संघात 3 नव्या चेहऱ्यांना संधी देण्यात आली. तर टी 20 वर्ल्ड कपमधील 8 खेळाडूंचं नावच नाही. या 8 पैकी काही खेळाडूंना विश्रांती देण्यात आली आहे. तर काहींना बाहेर बसवण्यात आलं आहे. (india vs new zealand t 20 series selection committee dropped to hardik pandya and rahul chahar)


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हे आहेत 8 खेळाडू


विराट कोहली, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, हार्दिक पंड्या, राहुल चाहर आणि वरुण चक्रवर्ती. यामधून हार्दिक, वरुण आणि राहुल चाहरला वगळण्यात आलं आहे. तर उर्वरित खेळाडू हे सातत्याने खेळत होते. त्यांना विश्रांतीची गरज होती. तसेच या खेळाडूंचं कसोटी मालिकेसाठी पुनरागमन होणार आहे. 


हार्दिक पंड्या सातत्याने निराशजनक कामगिरी करत होता. त्याला टी 20 वर्ल्ड कपमध्ये त्याच्या लौकीकाला साजेशी कामगिरी करता आली नाही. याआधी आयपीएलच्या 14 व्या मोसमातही हार्दिकने फार काही विशेष केलं नाही. त्यामुळे हार्दिकला डच्चू मिळणार असल्याचं म्हंटलं जात होतं.  


ऋतुराज, हर्षल आणि व्यंकटेशला संधी


निवड समितीने आयपीएलच्या 14 व्या मोसमात दमदार कामगिरी करणाऱ्या युवा खेळाडूंना संधी दिली आहे. यामध्ये ऋतुराज गायकवाड आणि हर्षल पटेलला संधी दिली आहे. ऋतुराज हा 14 व्या मोसमातील ऑरेन्ज कॅप होल्डर राहिला आहे. एका मोसमात सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला ऑरेन्ज कॅप दिली जाते. ऋतुराजने श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत पदार्पण केलं आहे. तर व्यंकटेश अय्यर आणि हर्षल पटेलला पहिल्यांदा संधी मिळाली आहे.


या खेळाडूंचं संघात पुनरागमन 


न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेत फिरकीपटू युजवेंद्र चहल आणि वेगवान मोहमम्द सिराजचं कमबॅक झालं आहे. तर श्रेयस अय्यर, अक्षर पटेल आणि दीपक चाहरलाही संधी मिळाली आहे.      


न्यूझीलंड विरुद्धच्या टी 20 मालिकेसाठी टीम इंडिया - रोहित शर्मा (कर्णधार), केएल राहुल (उपकर्णधार), ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), इशान किशन (यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, युझवेंद्र चहल, आर अश्विन, अक्षर पटेल, आवेश खान, भुवनेश्वर कुमार, दीपक चहर, हर्षल पटेल आणि मोहम्मद सिराज.