नेपिअर : ऑस्ट्रेलियाचा यशस्वी दौरा संपल्यानंतर भारतीय संघ न्यूझीलंडला रवाना झाला आहे. न्यूझीलंडमध्ये भारत ५ एकदिवसीय सामने आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. यातल्या एकदिवसीय मालिकेला बुधवार २३ जानेवारीपासून सुरुवात होणार आहे. या एकदिवसीय मालिकेमध्ये भारतीय टीमचा कर्णधार विराट कोहलीला विरेंद्र सेहवाग आणि सचिन तेंडुलकरचं रेकॉर्ड मोडण्याची संधी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यांमध्ये भारताकडून सेहवागनं सर्वाधिक ६ शतकं केली आहेत. विराट कोहलीला हा विक्रम मोडण्याची संधी आहे. या यादीमध्ये विराट कोहली सचिन तेंडुलकरसोबत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सचिन आणि विराटनं न्यूझीलंडविरुद्ध ५ शतकं केली आहेत.


सचिन तेंडुलकर हा एकदिवसीय सामन्यांमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा भारतीय खेळाडू आहे. सचिननं न्यूझीलंडविरुद्ध १,७५० धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतकं आणि ८ अर्धशतकांचा समावेश आहे.


न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत विराट तिसरा क्रमांकावर आहे. विराटनं न्यूझीलंडविरुद्ध आत्तापर्यंत १,१५४ धावा केल्या आहेत. यामध्ये ५ शतकं आणि ६ अर्धशतकांचा समावेश आहे. न्यूझीलंडविरुद्ध सर्वाधिक धावा करणारा दुसरा भारतीय खेळाडू बनण्यासाठी विराटला फक्त ४ रनची गरज आहे. सध्या सेहवाग या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. सेहवगानं न्यूझीलंडविरुद्ध १,१५७ धावा आणि ६ शतकं तसंच ३ अर्धशतकं केली आहेत.


न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत सेहवगाचा शतकांचा विक्रम मोडण्यासाठी विराटला २ शतकांची गरज आहे. विराटनं आत्तापर्यंत न्यूझीलंडमध्ये ५ एकदिवसीय सामने खेळले आहेत. यामध्ये त्यानं ५८.२०च्या सरासरीनं २९१ धावा केल्या आहेत.


नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या ३ एकदिवसीय मॅचच्या मालिकेमध्ये विराटनं ५१ च्या सरासरीनं १५३ धावा केल्या. यातल्या पहिल्या सामन्यात विराट ३ धावांवर, दुसऱ्या सामन्यात १०४ धावांवर आणि तिसऱ्या सामन्यात ४६ धावांवर बाद झाला.