India vs Pakistan Asia Cup Shoaib Akhtar: भारत आणि पाकिस्तानदरम्यानचा आशिया चषक 2023 मधील सामना अवघ्या तासाभरामध्ये सुरु होणार आहे. पाकिस्तानने आशिया चषक स्पर्धेतील आपल्या पहिल्याच सामन्यात विजय मिळवला आहे. पाकिस्तानने नेपाळला 238 धावांनी पराभूत करुन विजयासहीत स्पर्धेस सुरुवात केली आहे. तर दुसरीकडे भारत यंदाच्या वर्षी पहिल्यांदाच थेट पाकिस्तानविरुद्ध या स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळेच पाकिस्तानी संघाचा आत्मविश्वास अधिक असेल असं सांगितलं जात आहे. मात्र सामन्याच्या सुरुवातीपासूनच पाकिस्तानी संघावर आपला दबाव निर्माण करण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असेल. दरम्यान सामना सुरु होण्याच्या आधीच पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अख्तरने हा सामना कोण जिंकेल याबद्दल भाष्य केलं आहे. 


तो संघ जिंकेल सामना


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शोएब अख्तरने आपल्या युट्यूब चॅनेलवर पोस्ट केलेल्या व्हिडीओमध्ये भारत पाकिस्तान सामना कोण जिंकणार याबद्दल भाष्य करताना नाणेफेकीचा उल्लेख केला आहे. जो संघ पहिल्यांदा फलंदाजी करेल तो सामना सहज जिंकेल असं शोएबचं म्हणणं आहे. "बाबर आझम आणि त्याचा संघ फारच प्रगल्भ आहे. त्यांनी यापूर्वीही भारताविरुद्ध दबावाखाली चांगला खेळ केला आहे. आज ते दबावामध्ये नसतील. जर पाकिस्तानने टॉस जिंकून पहिल्यांदा फलंदाजीचा निर्णय घेतला तर मी हे सांगू शकतो की ते सामना सहज जिंकतील. जर भारताने टॉस जिंकला तर पाकिस्तानचं टेन्शन वाढेल. भारताने प्रथम फलंदाजी केली तर भारत सामना जिंकेल. कारण लाइट्स असतील तर चेंडू बॅटवर योग्य पद्धतीने येत नाही," असं शोएब म्हणाला. 


दोन्ही संघ उत्तम पण...


"दोन्ही संघांकडे उत्तम संधी आहे. जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज सर्वच खेळणार आहेत. कुलदीप यादवही सामना खेळू शकतो. विराट कोहलीसंदर्भात तो क्रमांक 3 वर खेळणार की 4 वर ही चर्चा आहे. ईशान किशन सलामीवीर म्हणून मैदानात उतरु शकतो किंवा त्याला 5 व्या क्रमांकावर फलंदाजीसाठी संधी दिली जाईल. मात्र सामन्यामध्ये पाकिस्तानचं पारडं जड वाटत आहे. त्यांच्याकडे आता पूर्वीप्रमाणे मधल्या फळीतील फलंदाज नाही," असंही शोएबने म्हटलं आहे.


पावसाचं सावट


एक्यूवेदर डॉट कॉमने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी आणि शनिवारी कॅण्डीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. शुक्रवारी या ठिकाणी पाऊस झाला सुद्धा. शनिवारी दिवसभर कॅण्डी शहरावर ढगांची चादर असेल. या ठिकाणी शनिवारी 10 मिलीमीटर पाऊस पडण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना दुपारी 3 वाजता खेळवला जाणार आहे. मात्र याचवेळी कॅण्डीमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे. एक्यूवेदरने दिलेल्या माहितीनुसार भारत पाकिस्तान सामन्यादरम्यान पाऊस पडेलच. शनिवारी सायंकाळी 5 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत पावसाची शक्यता व्यक्त केली जात आहे. म्हणजेच 6 तास पाऊस पडला तर सामना अगदी छोट्या फॉरमॅटमध्ये खेळवावा लागेल.