पाकिस्तानला पराभूत केलं तर फायनलमध्ये धडक देणार टीम इंडिया
भारत-पाकिस्तान पुन्हा आमने-सामने
दुबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज आशिया चषकातील दुसरा सामना रंगणार आहे. पहिल्या सामन्यात 8 विकेट्सने पाकिस्तानला पराभूत केल्यानंतर भारतीय टीम जर आजचा सामना जिंकते तर ती थेट फायनलमध्ये प्रवेश करणार आहे. शुक्रवारी बांगलादेशला 8 विकेट्सने पराभूत केल्यानंतर भारतीय संघ पुन्हा एकदा विजयासाठी सज्ज झाला आहे. तर पाकिस्तानला अफगाणिस्तानला पराभूत करण्यासाठी शेवटच्या ओव्हरपर्यंत कसरत करावी लागली होती.
रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाला हॉंगकॉंग विरुद्ध पहिल्या सामन्यात संघर्ष करावा लागला होता. पण त्यानंतर संघाने सुधारणा करत चांगली कामगिरी केली. मागच्या वर्षी जूनमध्ये झालेल्या चॅम्पियन ट्रॉफी मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात 2 सामने झाले होते. पहिल्या सामन्यात भारताने विजय मिळवला होता पण फायनलमध्ये पाकिस्तानने भारताला पराभूत केलं होतं.
आज होणाऱ्या सामन्यात भारताला पुन्हा एकदा सावध कामगिरी करावी लागेल. पाकिस्तान या सामन्यात विजयासाठी पूर्ण जोर लावेल. मागच्या सामन्यात भुवनेश्वर कुमारने 15 रन देत 3 विकेट आणि पार्टटाइम बॉलर केदार जाधव याने 23 रन देत 3 विकेट घेतल्या होत्या. यांच्या या शानदार कामगिरीमुळे भारतीय संघाने पाकिस्तानला मोठं टार्गेट देण्यापासून रोखलं होतं. कर्णधार रोहित शर्माने 52 रन करत विजयात महत्वाची कामगिरी बजावली होती.
अफगाणिस्तान विरोधात पाकिस्तानच्या संघाने खास करून बॅट्समनने चांगली कामगिरी केली होती. त्यामुळे पाकिस्तानचा आत्मविश्वास देखील वाढला असेल. भारतीय संघावर विजय मिळवण्यासाठी पाकिस्तान संघ आज पूर्ण जोर लावेल.