बुमराह विक्रमापासून एक पाऊल दूर, पुण्यात इतिहास घडवण्याची संधी
भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरी टी-२० मॅच खेळवली जाणार आहे.
पुणे : भारत आणि श्रीलंका यांच्यात आज तिसरी टी-२० मॅच खेळवली जाणार आहे. या मॅचमध्ये बुमराहला विक्रमाची संधी आहे. बुमराह हा सध्या अश्विन आणि चहलसोबत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारा भारतीय बॉलर आहे. बुमराह, चहल आणि अश्विनने आंतरराष्ट्रीय टी-२० क्रिकेटमध्ये प्रत्येकी ५२ विकेट घेतल्या आहेत. बुमराहने ४४ मॅचमध्ये, चहलने ३६ मॅचमध्ये आणि अश्विनने ४६ मॅचमध्ये ही कामगिरी केली आहे. भुवनेश्वर कुमारने ४३ मॅचमध्ये ४१ विकेट आणि कुलदीप यादवने २१ मॅचमध्ये ३९ विकेट घेतल्या आहेत.
२६ वर्षांचा जसप्रीत बुमराहने बऱ्याच कालावधीनंतर टीममध्ये पुनरागमन केलं आहे. दुखापतीमुळे बुमराह ऑगस्ट २०१९ नंतर टीम इंडियाकडून खेळला नाही. श्रीलंकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२०मध्ये बुमराहने ४ ओव्हरमध्ये ३२ रन देऊन १ विकेट घेतली.
भारत आणि श्रीलंकेमध्ये पुण्यात तिसरी आणि अखेरची टी-२० मॅच खेळवली जाणार आहे. गुवाहाटीमधली पहिली मॅच पावसामुळे रद्द झाल्यानंतर इंदूरच्या टी-२०मध्ये भारताचा ७ विकेटने दणदणीत विजय झाला. आता तिसरी टी-२० जिंकून सीरिज खिशात टाकण्याची संधी भारतीय टीमला आहे.