India Vs West Indies 2nd T-20: भारत विरुद्ध वेस्ट इंडीजदरम्यान सध्या 5 सामन्यांची टी-20 मालिका सुरु आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज म्हणजेच 6 ऑगस्ट रोजी खेळवला जणार आहे. प्रोविडेन्स स्टेडियममध्ये हा सामना खेळवला जाणार आहे. पहिल्या सामन्यामध्ये हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाचा यजमान संघाने 4 धावांनी पराभव केला. त्यामुळे आता दुसऱ्या सामन्यामध्ये भारत यजमानांना पराभूत करुन मालिकेत 1-1 ची बरोबर करेल की वेस्ट इंडीजचा संघ 2-0 ची आघाडी घेईल हे आज निश्चित होईल. भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री 8 वाजल्यापासून सुरु होती. या सामन्यामध्ये भारतीय संघाकडून एक दमदार खेळाडू टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करु शकतो.


ही मालिका फार महत्त्वाची


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

काही आठवड्यांवर आलेली आशिया चषक स्पर्धा आणि वर्षाच्या शेवटी खेळवल्या जाणाऱ्या एकदिवसीय वर्ल्डकप स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर अनेक भारतीय खेळाडूंसाठी वेस्ट इंडीजविरुद्धची मालिका महत्त्वाची मानली जात आहे. कर्णधार हार्दिक पंड्या स्वत:ची कामगिरी सुधारण्याचे प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे ईशान किशन आणि शुभमन गिल यांना चांगल्या खेळी करता आल्या तर त्यांचा आत्मविश्वास नक्कीच वाढेल. तसेच भारतासाठी सूर्यकुमार यादव आणि संजू सॅमसनसारख्या खेळाडूंची बॅट तळपणेही महत्त्वाचे आहे.


भारतीय फलंदाजांकडून निराशा


वेस्ट इंडीजविरुद्धच्या पहिल्या टी-20 सामन्यामध्ये भारतीय फलंदाजांनी चांगलीच निराशा केली. तिलक वर्मा वगळता एकाही खेळाडूला 25 धावांचा टप्पाही ओलांडता आला नाही. ईशान किशन आणि शुभमन गिल आक्रमक फटकेबाजीच्या नादात लवकरच बाद झाले. दुसरीकडे कर्णधार हार्दिक पंड्या आणि संजू सॅमसनने चांगली सुरुवात केल्यानंतर सातत्य राखू शकले नाहीत. तर सूर्यकुमार यादवला सातत्यपूर्ण खेळी करण्यात येत असलेलं अपयश या सामन्यातही दिसून आलं.


या खेळाडूंना आराम आवश्यक


वेस्ट इंडीजविरुद्धचे 5 टी-20 सामने 9 दिवसांमध्ये 3 देशांत खेळवले जाणार आहेत. त्रिनिदाद अॅण्ड टोबॅगो, गुयाना आणि अमेरिकेत हे सामने खेळवले जाणार आहेत. त्यामुळेच हार्दिक पंड्या, गिल, ईशान आणि कुलदीप यादव यांना आराम करण्यासाठी पुरेसा वेळ मिळणंही आवश्यक आहे. भारती संघामध्ये मोठ्या प्रमाणात तरुण खेळाडू असले तरी चेंडू उसळी खेळणाऱ्या खेळपट्ट्यांवर खेळणं त्यांना कठीण जात आहे.


या खेळाडूला मिळू शकते संधी


हा सर्व गोष्टींचा विचार करुनच भारतीय संघ व्यवस्थापन वेस्ट इंडीजविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यामध्ये ईशान किंवा गिलच्या जागी जयशस्वी जयस्वालला संधी देऊ शकते. 'भारताची नवी रन मशीन' अशी ओळख अगदी अल्पावधीत मिळवलेल्या यशस्वीने याच दौऱ्यात कसोटीमध्ये पदार्पण केलं आहे. 21 वर्षीय यशस्वीने आपल्या पहिल्याच कसोटीमध्ये धावांचा पाऊस पाडला. त्याने 3 डावांमध्ये 88.66 च्या सरासरीने 266 धावा केल्या. आता यशस्वीला टी-20 मध्ये संधी मिळाली तर तो त्याचं सोनं करण्याचाच प्रयत्न करेल यात शंका नाही. प्रोविडेन्स स्टेडियममध्ये खेळवण्यात आलेल्या 11 टी-20 सामन्यांपैकी 3 सामन्यांमध्ये जोरदार पाऊस पडल्याने खेळ झाला नाही. बाकी 8 पैकी 5 सामन्यांमध्ये यजमान संघाचा पराभव झाला आहे.