मुंबई : वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजमध्ये विजय मिळवल्यानंतर आता वनडे सीरिजला सुरुवात होणार आहे. १५ डिसेंबरपासून ३ वनडे मॅचची सीरिज सुरु होईल. पण या सीरिजआधी टीम इंडियाला एक धक्का बसला आहे. भारताचा फास्ट बॉलर भुवनेश्वर कुमार दुखापतीमुळे या सीरिजमध्ये खेळू शकणार नाही. भुवनेश्वर कुमारच्याऐवजी मुंबईकर शार्दुल ठाकूरला संधी देण्यात आली आहे, अशी माहिती बीसीसीआयमधल्या एका अधिकाऱ्याने पीटीआयला दिली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शार्दुल ठाकूर हा बांगलादेशविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी टीममध्ये होता, पण वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० सीरिजसाठी त्याची निवड झाली नव्हती. शार्दुल ठाकूरऐवजी भुवनेश्वर कुमारने टीममध्ये पुनरागमन केलं होतं. पण आता पुन्हा एकदा भुवनेश्वरला दुखापत झाल्यामुळे शार्दुलला तिकीट मिळालं आहे. गुरुवारपर्यंत शार्दुल ठाकूर मुंबईकडून बडोद्यामध्ये रणजी ट्रॉफीची मॅच खेळत होता.


भुवनेश्वर कुमारला नक्की काय दुखापत झाली आहे, याची माहिती अजून मिळू शकली नाही. वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या दोन्ही टी-२०मध्ये भुवनेश्वरला एकही विकेट मिळाली नव्हती. तर शेवटच्या मॅचमध्ये त्याने २ विकेट घेतल्या होत्या.


मांडीच्या स्नायूंना झालेल्या दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार ४ महिने टीमबाहेर होता. यानंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजसाठी भुवनेश्वरची निवड करण्यात आली होती. २०१८ सालीही दुखापतीमुळे भुवनेश्वर कुमार इंग्लंड दौऱ्याला जाऊ शकला नव्हता. मागच्या २२ महिन्यात भुवनेश्वर एकही टेस्ट मॅच खेळला नाही.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे सीरिजआधी टीम इंडियाला हा दुसरा धक्का आहे. याआधी ओपनर शिखर धवनही दुखापतीमुळे बाहेर झाला. शिखर धवनऐवजी मयंक अग्रवालला संधी देण्यात आली आहे.


सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये महाराष्ट्राविरुद्धच्या मॅचमध्ये धवनच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. धवनच्या गुडघ्याला टाके पडले होते, हे टाके आता काढण्यात आले असले तरी त्याला दुखापतीतून सावरायला वेळ लागणार आहे, असं बीसीसीआयने सांगितलं आहे.


टी-२० सीरिजसाठीही शिखर धवनची निवड झाली होती, पण दुखापतीनंतर त्याच्याऐवजी संजू सॅमसनला निवडण्यात आलं. पण सॅमसनला एकाही मॅचमध्ये अंतिम-११ खेळाडूंमध्ये संधी देण्यात आली नाही.


वेस्ट इंडिजविरुद्धच्या ३ वनडे मॅचच्या सीरिजला १५ डिसेंबरपासून सुरुवात होणार आहे. चेन्नईमध्ये या सीरिजची पहिली मॅच होईल. यानंतर १८ डिसेंबरला विशाखापट्टणममध्ये आणि २२ डिसेंबरला कटकमध्ये मॅच होतील.


भारतीय टीम


विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा, मयंक अग्रवाल, केएल राहुल, श्रेयस अय्यर, मनिष पांडे, ऋषभ पंत, शिवम दुबे, केदार जाधव, रवींद्र जडेजा, युझवेंद्र चहल, कुलदीप यादव, दीपक चहर, मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर