पोर्ट ऑफ स्पेन : विराट कोहलीचं शतक आणि श्रेयस अय्यरच्या अर्धशतकाच्या जोरावर वेस्ट इंडिजविरुद्धच्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताने २७९ रनपर्यंत मजल मारली. ५० ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर २७९/७ एवढा झाला. टॉस जिंकून पहिले बॅटिंगचा निर्णय घेणाऱ्या टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. या दौऱ्यात फॉर्मसाठी झगडणारा शिखर धवन या मॅचमध्येही अपयशी ठरला. ३ बॉलमध्ये २ रन करून धवन माघारी परतला. रोहित शर्माही १८ रन करून आऊट झाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेल्या ऋषभ पंतला सुरुवात मिळाली, पण त्याला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. ऋषभ पंत ३५ बॉलमध्ये २० रन करून पॅव्हेलियनमध्ये गेला. यानंतर विराट आणि श्रेयस अय्यरने भारताचा डाव सावरला. विराटने वनडे क्रिकेटमधलं त्याचं ४२वं शतक पूर्ण केलं. विराटने १२५ बॉलमध्ये १२० रन केले, यामध्ये १४ फोर आणि १ सिक्सचा समावेश होता. श्रेयस अय्यरने ६८ बॉलमध्ये ७१ रन केले.


विराट कोहली आणि श्रेयस अय्यर आऊट झाल्यानंतर मात्र भारताच्या बॅट्समनना मोठे फटके मारता आले नाहीत. केदार जाधव १६ रनवर आऊट झाला, तर रवींद्र जडेजा १६ रनवर नाबाद राहिला. वेस्ट इंडिजकडून कार्लोस ब्रॅथवेटने सर्वाधिक ३ विकेट घेतल्या, तर शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर आणि रोस्टन चेसला प्रत्येकी १-१ विकेट मिळाली.


३ वनडे मॅचच्या या सीरिजमधली पहिली वनडे पावसामुळे रद्द झाली होती. त्यामुळे ही मॅच जिंकून सीरिजमध्ये आघाडी घेण्याचा प्रयत्न टीम इंडिया करणार आहे.