६ फूट उंच आणि १४० किलो वजनाचा क्रिकेटपटू, भारताविरुद्ध खेळणार
भारताविरुद्धच्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केली आहे.
मुंबई : भारताविरुद्धच्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजसाठी वेस्ट इंडिजने टीमची घोषणा केली आहे. वेस्ट इंडिजच्या टीममध्ये १३ खेळाडूंना संधी देण्यात आली आहे. या टीममध्ये निवड झालेला रहकीम कॉर्नवॉल सध्या चर्चेचा विषय ठरला आहे. रहकीम कॉर्नवॉलला पहिल्यांदाच वेस्ट इंडिजच्या टीममध्ये निवड झाली आहे. भारताविरुद्धच्या टेस्ट मॅचमध्ये संधी मिळाली तर कॉर्नवॉलचं हे टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण ठरेल. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये कॉर्नवॉलने चमकदार कामगिरी केली आहे.
२६ वर्षांचा रहकीम कॉर्नवॉलची उंची ६ फूट ६ इंच आणि वजन १४० किलो एवढं आहे. रहकीम पहिल्यांदा इंग्लंडविरुद्धच्या सराव सामन्यात दिसला होता. कॅरेबियन बेटांवरच्या एंटीग्वामध्ये राहणारा मोठ्या शरीरयष्टीचा रहकीम मोठे शॉट मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधल्या फिट खेळाडूंसमोर कॉर्नवॉलचा निभाव लागेल का? हा प्रशअन उपस्थित होत आहे. पण वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्ड कॉर्नवॉलला फिट बनवण्यासाठी वेगवेगळी पावलं उचलत आहे.
५५ प्रथम श्रेणी मॅचमध्ये कॉर्नवॉलने २४.४३ च्या सरासरीने २,२२४ रन केले आहेत. तर २३.६० च्या सरासरीने २६० विकेटही घेतल्या आहेत. या कामगिरीमुळे कॉर्नवॉलची भारताविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी निवड करण्यात आली. २०१७ साली भारताविरुद्धच्या सराव सामन्यात कॉर्नवॉलने ५ विकेट घेतल्या होत्या.
वेस्ट इंडिजची टेस्ट टीम
जेसन होल्डर (कर्णधार), क्रेग ब्रॅथवेट, डॅरेन ब्राव्हो, शमाराह ब्रूक्स, जॉन कॅम्पबेल, रोस्टन चेस, रहकीम कॉर्नवॉल, शेन डाऊरिच, शेनन गॅब्रियल, शिमरोन हेटमायर, शाय होप, कीमो पॉल, केमार रोच