कटक : ओडिशा क्रिकेट असोशिएशनच्या कटकमधील स्टेडियमवर उद्या भारत आणि वेस्टइंडिज यांच्यात तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय सामना रंगणार आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ प्रत्येकी एक विजय मिळवून बरोबरीत आहेत. त्यामुळे मालिकेतील विजयासाठी उद्याचा सामना अत्यंत महत्वाचा असेल. दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं चौफेर कामगिरी करून वेस्ट इंडिजवर तब्बल १०८  धावांनी विजय मिळवला. पण वेस्ट इंडिजला कमी लेखून चालणार नाही. हे देखील भारतीय टीमला आणि कर्णधार विराट कोहलीला चांगलं माहित आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

आयपीएलमुळे भारतीय वातावरणात उत्तम कामगिरी करणारे अनेक खेळाडू त्यांच्या संघात आहेत. त्यामुळे उद्याचा सामना चुरशीचा होण्याची शक्यता आहे.


वेस्टइंडिजने चेन्नईमध्ये झालेल्या पहिल्या सामन्यात 8 विकेटने विजय मिळवला होता. कटकच्या इतिहासात भारतीय टीमचा कधीच वेस्ट इंडिज समोर पराभव झालेला नाही. या मैदानात स्पिनर्स चांगली खेळी करु शकतात. त्यामुळे टीम इंडियामध्ये बदल होण्याची शक्यता आहे. 


भारतीय क्रिकेट टीमचा चायनामॅन स्पिनर कुलदीप यादवने वेस्टइंडिजच्या विरोधात दुसऱ्या वनडेमध्ये हॅट्रिक घेत इतिहास रचला होता. वनडेमध्ये दोन वेळा त्याने हा कारनामा केला आहे. त्यामुळे सीरीजच्या शेवटच्या आणि निर्णायक सामन्यात त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा वाढली आहे. कुलदीप यादवने वनडेमध्ये 99 विकेट घेतल्या आहेत.