चेन्नई : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच वनडेच्या सीरिजला रविवारपासून सुरुवात होणार आहे. या सीरिजची पहिली वनडे चेन्नईच्या एम.ए.चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात येणार आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चेन्नईत याआधी ३० वर्षांपूर्वी ऑक्टोबर १९८७ मध्ये वनडे मॅच झाली होती. त्यावेळी विराट कोहली आणि स्टिव्ह स्मिथचा जन्मही झाला नव्हता.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

३० वर्षांपूर्वी चिदंबरम स्टेडियमवर खेळवण्यात आलेला हा पहिलाच वनडे सामना होता. या मॅचनंतर पुन्हा कधीच भारत आणि ऑस्ट्रेलियामध्ये चिदंबरम स्टेडियमवर मॅच झालेली नाही. पहिल्या मॅचनंतर ऑस्ट्रेलियानं या स्टेडियमवर तीन मॅच खेळल्या पण त्या झिम्बाब्वे, वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडविरुद्ध होत्या.


ऑक्टोबर १९८७ साली वर्ल्ड कपच्या मॅचमध्ये जेफ मार्शनं केलेल्या ११० रन्सच्या खेळीमुळे ऑस्ट्रेलियानं भारतापुढे विजयासाठी २७१ रन्सचं आव्हान ठेवलं. श्रीकांतच्या ७० रन्स आणि सिद्धूच्या ७३ रन्समुळे भारत ही मॅच जिंकेल असं वाटत होतं. पण फक्त ४० रन्समध्येच भारताच्या ७ विकेट गेल्या आणि एका रननं भारत ही मॅच हारला. ३० वर्षांनंतर आता भारत या पराभवाचा वचपा काढण्यासाठी मैदानात उतरेल.


या मॅचनंतर ऑस्ट्रेलियानं चिदंबरम स्टेडियमवर आणखी तीन मॅच खेळल्या. या तिन्ही मॅचमध्येही ऑस्ट्रेलियाचा अगदी सहज विजय झाला आहे. त्यामुळे चारपैकी चार मॅचमध्ये ऑस्ट्रेलियानं चिदंबरम स्टेडियमवर विजय मिळवला आहे.


चिदंबरम स्टेडियमवर भारत ऑस्ट्रेलियात चार टेस्ट मॅच खेळवण्यात आल्या. यापैकी तीन टेस्टमध्ये भारताचा विजय झाला तर एक टेस्ट ड्रॉ झाली. भारतानं चिदंबरम स्टेडियमवर आत्तापर्यंत ११ वनडे खेळल्या आहेत. यातल्या सहा मॅचमध्ये भारताचा विजय, चारमध्ये पराभव आणि एका मॅचचा निकाल लागला नाही.