indvsnz: न्यूझीलंडमध्ये भारताला टी-२० मालिका विजयाची संधी
३ सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकला आहे.
हॅमिल्टन : भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध झालेल्या दुसऱ्या सामन्यात ७ विकेटने विजय मिळवला आहे. यामुळे ३ सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ अशी बरोबरी केली आहे. पहिल्या सामन्यात न्यूझीलंडने भारताचा तब्बल ८० धावांनी पराभव केला होता. पण भारतीय संघाने दुसऱ्या सामन्यात जोरदार पुनरागमन करत मालिकेत बरोबरी केली आहे. भारतीय संघाला आतापर्यंच न्यूझीलंड मध्ये टी-२० मालिका जिंकता आलेली नाही. त्यामुळे उद्या होणारा मालिकेतील अखेरचा सामना जिंकून भारताला मालिका जिंकण्याची संधी आहे.
हॅमिल्टन येथे होणार सामना
टी-२० मालिकेतील अखेरचा सामना हा उद्या (१० फेब्रुवारी) हॅमिल्टन येथे खेळला जाणार आहे. या खेळपट्टीवर खेळताना भारतीय संघाला विशेष काळजी घ्यावी लागणार आहे. त्याच कारण ही तसंच आहे. या टी-२० मालिकेआधी भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत ४-१ ने यजमान न्यूझीलंडचा पराभव केला. पण हॅमिल्टन येथे झालेल्या चौथ्या सामन्यात भारतीय संघावर अवघ्या ९२ धावांवर ऑलआऊट होण्याची नामुश्की ओढावली होती. त्यामुळे भारतीय संघाला उद्याच्या सामान्यात विशेष काळजी आणि योजनेसह खेळावे लागेल.
चुकांची पुनरावृत्ती नको
आम्ही केलेल्या चुकांची पुनरावृत्ती करणार नाही. रविवारी होणाऱ्या सामन्यात आम्ही चांगली कामगिरी करु. आम्ही हेमिल्टन मध्ये खेळलो आहोत. दुसऱ्या सामान्यात विजय झाल्यामुळे आमचा आत्मविश्वास दुणावला आहे. पहिल्या टी-२० सामन्यात झालेल्या चुका हेरुन आम्ही त्या करणार नाहीत. असे भारताचा वेगवान गोलंदाज खलील अहमद म्हणाला.
कुलदीप यादवला संधी ?
पहिल्या दोन सामन्यात भारतीय संघ ज्या अंतिम-११ खेळाडूंसोबत खेळला. तोच संघ तिसऱ्या सामन्यासाठी कायम ठेवण्याचा विचार संघ प्रशासनाचा असेल. जर बदल करायचा झाल्यास संघ प्रशासन युदवेंद्र चहाल ऐवजी संघात कुलदीप यादवला संधी देऊ शकतो.
कृणाल पांड्याची कामगिरी
दुसऱ्या सामन्यात कृणाल पांड्याने न्यूझीलंडविरुद्ध ३ विकेट घेतले. या कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. ही अशीच कामगिरी तिसऱ्या सामन्यात कायम ठेवण्याचा प्रयत्न कृणालचा असेल. भारताचा हंगामी कर्णधार रोहित शर्माच्या नावे टी-२० मध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम झाला आहे. दुसऱ्या सामन्यात केलेली कामगिरी तिसऱ्या सामन्यात देखील कायम ठेवण्याचा मानस रोहितचा असेल. तसेच आपल्या नेतृत्वात भारतीय संघाला न्यूझीलंड मध्ये पहिल्यांदा टी-२० मालिका जिंकवून देण्याचा विक्रम आपल्या नावे करण्याचा प्रयत्न रोहितचा असेल.
तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघांनी १-१ सामना जिंकला आहे. त्यामुळे उद्या (१० फेब्रुवारी) होणारा सामना हा चुरशीचा ठरणार आहे. भारताने एकदिवसीय मालिका जिंकली आहे. त्यामुळे हा सामना जिंकत ही टी-२० मालिका जिंकून शेवट गोड करण्याचा प्रयत्न भारतीय संघाचा असेल.