लंडन : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. १ ऑगस्टपासून या सीरिजची पहिली टेस्ट खेळवण्यात येणार आहे. पण या सीरिजच्या निर्णयाबद्दल भारताचे माजी क्रिकेटपटू गौतम गंभीर आणि जहीर खाननं भाकीत केलं आहे. या दोघांनी केलेलं हे भाकीत भारतीय टीम आणि क्रिकेट रसिकांना रुचणार नाही. ही टेस्ट सीरिज इंग्लंड जिंकेल असं गौतम गंभीरला वाटतंय. तर ५ टेस्ट मॅचची सीरिज १-१नं बरोबरीमध्ये सुटेल असं जहीर खान म्हणाला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जेम्स अंडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉड या फास्ट बॉलरमुळे इंग्लंडचं पारडं जड आहे. अंडरसननं नेहमीच भारतीय बॅट्समनला त्रास दिला आहे, असं गंभीर म्हणाला. तर जहीरनं मात्र सीरिजबरोबरीत सुटेल असं सांगतिलं. या सीरिजमध्ये अशाही खेळपट्ट्या असतील जिकडे डोंगराएवढ्या रन होतील आणि मॅचचा निकाल लागणार नाही. तर काही ठिकाणी हिरवी खेळपट्टी असेल, असं जहीरला वाटतंय.


२०१४ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये हे दोन्ही खेळाडू भारतीय टीममध्ये नव्हते. या सीरिजमध्ये भारताचा ३-१नं पराभव झाला होता. तर २०११ सालच्या इंग्लंड दौऱ्यामध्ये गंभीर आणि जहीर भारतीय टीमचा भाग होते. या सीरिजमध्ये भारताचा ४-०नं दारुण पराभव झाला होता.