भारत विरुद्ध इंग्लंड : कोहली सेनेच्या पहिल्या क्रमांकाला किती धोका?
इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे.
लंडन : इंग्लंडविरुद्धच्या टी-२० आणि वनडे सीरिजनंतर आता ५ टेस्ट मॅचच्या सीरिजला सुरुवात होणार आहे. इंग्लंडच्या जमिनीवर कामगिरी सुधारण्याचं आव्हान कोहलीच्या टीमपुढे असणार आहे. याआधी २००७ साली भारत इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकला होता. त्यावेळी राहुल द्रविड भारताचा कर्णधार होता. पण यानंतर २०११ आणि २०१४ साली झालेल्या दौऱ्यांमध्ये भारताला दारुण पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा इंग्लंड दौऱ्यावर गेलेली भारतीय टीम टेस्ट क्रिकेटमध्ये पहिल्या क्रमांकावर आहे. त्यामुळे या दौऱ्यामध्ये भारताची कामगिरी चांगली होईल अशी अपेक्षा वर्तवण्यात येतेय.
आयसीसी क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावर असलेल्या भारतीय टीमला सध्या तरी पहिला क्रमांक गमावण्याचा कोणताही धोका नाही. इंग्लंडविरुद्धची सीरिज भारतानं ५-०नं गमावली तरी भारत पहिल्या क्रमांकावर कायम राहणार आहे. भारताच्या खात्यात सध्या १२५ पॉईंट्स आहेत.
दक्षिण आफ्रिकेनं श्रीलंकेविरुद्धची सीरिज २-०नं गमावल्याचा फायदा भारताला झाला आहे. श्रीलंकेसमोर पराभव झाल्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या दक्षिण आफ्रिकेचे ११२ वरून १०६ पॉईंट्स झाले आहेत. आयसीसी क्रमवारीमध्ये इंग्लंड पाचव्या क्रमांकावर आहे. इंग्लंडकडे सध्या ९७ पॉईंट्स आहेत. इंग्लंडप्रमाणेच श्रीलंकेकडेही ९७ पॉईंट्सच आहेत. पण काही अंशांच्या फरकामुळे इंग्लंड पाचव्या तर श्रीलंका सहाव्या क्रमांकावर आहे.
आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीमध्ये ऑस्ट्रेलियाचा निलंबित खेळाडू स्टिव्ह स्मिथ पहिल्या क्रमांकावर कायम आहे. तर भारताचा कर्णधार विराट कोहली दुसऱ्या, इंग्लंडचा कर्णधार जो रूट तिसऱ्या आणि न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसन चौथ्या क्रमांकावर आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा सहाव्या क्रमांकावर आहे. स्मिथ बरोबरच निलंबन झालेला ऑस्ट्रेलियाचा डेव्हिड वॉर्नर या क्रमवारीमध्ये पाचव्या स्थानावर आहे.
बॉलरच्या यादीमध्ये कागिसा रबाडाची पहिल्या क्रमांकाची जागा इंग्लंडचा बॉलर जेम्स अंडरसननं घेतली आहे. भारताचा स्पिनर रवींद्र जडेजा तिसऱ्या आणि अश्विन पाचव्या क्रमांकावर आहे.