INDvsAUS : धोनी-जाधवची कमाल, पहिल्या मॅचमध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय
या विजयामुळे भारताने ५ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
हैदराबाद : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्या मॅच मध्ये भारताचा ६ विकेटने दणदणीत विजय झाला आहे. महेंद्र सिंह धोनी-केदार जाधव या जोडीने भारताला विजय मिळवून दिला. भारताकडून केदार जाधवने सर्वाधिक नॉट आऊट ८१ रन तर धोनीने नॉटआऊट ५९ रन केल्या. भारत संकटात असताना धोनी-जाधव या जोडीने चांगली खेळी केली. या दोघांमध्ये नॉटआऊट १४१ रनची विजयी भागीदारी झाली. भारताने हे विजयी आव्हान ४ विकेटच्या मोबदल्यात पार केले. भारताने ४८.२ ओव्हरमध्ये २४० रन काढल्या. धोनीने विजयी फटका मारुन भारताला विजय मिळवून दिला. या विजयामुळे भारताने ५ वनडे मॅचच्या सीरिज मध्ये १-० अशी आघाडी घेतली आहे.
ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी २३७ रनचे आव्हान दिले होते. या विजयी आकड्याचा पाठलाग करताना भारताची सुरुवात निराशाजनक झाली. शिखर धवनला भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर आलेल्या कॅप्टन विराट कोहली आणि रोहित शर्मा या दोघांनी भारताच्या डावाला स्थिरता दिली. या दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ७६ रनची महत्वपूर्ण भागीदारी केली. भारताचा स्कोअर ९५ असताना कोहली ४४ रनवर आऊट झाला. कोहलीला चांगली सुरुवात मिळाली होती, पण त्याला मोठी खेळी करता आली नाही. कोहलीच्या मागोमाग रोहित शर्मा देखील ३७ रन करुन आऊट झाला. यानंतर लगोलग अंबाती रायुडू देखील १३ रनवर खेळत असताना कॅचआऊट झाला. रायुडूने क्रिकेटचाहत्यांची निराशा केली. ऑस्ट्रेलियाकडून नॅथन कुल्टर नाईल आणि एडम झॅम्पा या दोघांनी प्रत्येकी २ विकेट घेतल्या.
याआधी ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाला पहिला झटका बुमराहने दिला. कॅप्टन एरॉन फिंचला बुमराहने भोपळा देखील फोडू दिला नाही. यानंतर उस्मान ख्वाजा आणि मार्क्स स्टोनिस यांच्यात ८७ रनची भागीदारी झाली. या भागीदारीला केदार जाधवने मोडले. धोनीने केदार जाधवच्या बॉलिंगवर, ऑस्ट्रेलियाचा स्कोअर ८७ असताना मार्क्स स्टोनिसला स्टंपिग केले. यानंतर अवघ्या दहा रननंतर म्हणजेच ९७ रन असताना उस्मान ख्वाजाला कुलदीप यादवने बाहेरचा रस्ता दाखवला. ठराविक अंतराने ऑस्ट्रेलियाचे विकेट जात होते. ऑस्ट्रेलियाकडून सर्वाधिक ५० रन या उस्मान ख्वाजाने केल्या. तर ग्लेन मॅक्सवेल याने ४० तर मार्क्स स्टोनिसने ३७ रन काढल्या. भारताकडून मोहम्मद शमी, जस्प्रीत बुमराह आणि कुलदीप यादवने प्रत्येकी २ विकेट घेतल्या. तर केदार जाधवने १ विकेट घेऊन चांगली साथ दिली.