नेपिअर : स्मृती मानधनाच्या शतकी खेळीमुळे भारतीय महिला क्रिकेट संघाने ९ विकेटने न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवला आहे. या विजयामुळे महिला संघाने देखील पुरुष संघाच्या पाठोपाठ विजयी मालिका सुरु ठेवली आहे. भारतीय महिला संघाने तीन सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना जिंकल्याने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे. भारताला विजयासाठी न्यूझीलंडने १९३ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची दमदार सुरुवात झाली. सलामीवीर स्मृती मानधना आणि जेमिमा रॉड्रिग्ज यांनी फटकेबाजी करत दमदार खेळी केली. स्मृती मानधनाने आपलं शतक साजरं केलं. भारताला विजयासाठी अवघ्या ३ धावांची गरज असताना स्मृती मानधनाच्या रुपात भारताला पहिला झटका लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



स्मृती मानधना भारताची धावसंख्या १९० असताना बाद झाली. तिने १०४ चेंडूत ९ चौकार आणि ३ षटकाराच्या मदतीने १०५ धावा केल्या. तर जेमिमा रॉड्रिग्जने विजयी शॉट मारुन भारताला विजय मिळवून दिला. जेमिमाने नाबाद ८१ धावांची खेळी केली. तसेच स्मृती मानधनाला चांगली साथ दिली. स्मृती मानधनाच्या या शतकी खेळीसाठी तिला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.


याआधी, नाणेफेक जिंकत भारतीय संघाने यजमान न्यूझीलंडला फलंदाजासाठी आमंत्रित केले. न्यूझीलंडच्या सलामीवीर सुझी बेट्स आणि सोफी डेविन यांनी पहिल्या विकेटसाठी ६१ धावा जोडल्या. न्यूझीलंडला पहिला झटका ६१ धावांवर बसला. सोफी डेविनला दिप्ती शर्माने २८ धावांवर धावबाद केले. यानंतर भारतीय गोलंदाजांनी न्यूझीलंडला एकामागे एक झटके द्यायला सुरुवात केली. भारतीय गोलंदाजांनी ठराविक कालांतराने न्यूझीलंडला झटके दिले. पहिली विकेट गेल्यानंतर कोणत्याच खेळाडूला चांगली खेळी करता आली नाही. न्यूझीलंडच्या तीन फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. न्यूझीलंडकडून सर्वाधिक धावा सुझी बेट्सने केल्या. तिने ३६ धावा केल्या.


न्यूझीलंडला पूर्ण ५० षटके सुद्धा खेळता आले नाही. भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडचा डाव १९२ धावांवर आटोपला. गोलंदाजी करताना एकता बिष्ठ आणि पूनम यादवने प्रत्येकी ३-३ विकेट घेतल्या तर, दिप्ती शर्मा आणि शिखा पांडे यांनी प्रत्येकी २ आणि १ विकेट घेत उत्तम साथ दिली. न्यूझीलंड विरुद्ध दुसरा एकदिवसीय सामना २९ जानेवारीला माऊंट मोनगानुई येथे रंगणार आहे.