IND vs BAN, 2nd Test: भारतीय संघाने दुसऱ्या कसोटी सामन्यात बांगलादेशचा (India vs Bangladesh) 3 गडी राखून पराभव केला आहे. भारताकडून रविचंद्रन अश्विन आणि श्रेयस अय्यर यांनी तुफानी खेळ दाखवला. या दोन खेळाडूंमुळेच टीम इंडियाचा (team India) विजय झाला. अश्विनने शेवटच्या टप्प्यात सलग दोन चौकार मारत संघाला झंझावाती विजय मिळवून दिला. एकेकाळी टीम इंडिया 7 विकेट्स गमावून अडचणीत दिसत होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दरम्यान बांगलादेशचा दुसरा डाव 231 धावांवर आटोपला आणि भारताला विजयासाठी 145 धावांचे लक्ष्य मिळाले, जे पार करता करता भारताचे 7 गडी बाद झाले पण अखेर अय्यर आणि अश्विन जोडीने संयमी खेळ दाखवत 3 गडी राखून विजय मिळवला. या विजयासह भारतानं दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेत बांगलादेशला क्लिन स्वीप दिला आहे.


टीम इंडियाने हा सामना जिंकला


145 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खूपच वाईट झाली होती. केएल राहुल आणि शुभमन गिल लगेचच बाद झाले. तर केएल राहुलने 2 आणि शुभमन गिलने 7 धावा केल्या. विराट कोहलीला केवळ एकच धाव करता आली. त्याचवेळी चेतेश्वर पुजाराने 40 धावांचे योगदान दिले. टीम इंडियाने अवघ्या 45 धावांत चार विकेट गमावल्या. यानंतर चौथ्या दिवसाच्या खेळात मेहदी हसनने आपली किलर गोलंदाजी सुरू ठेवली आणि शानदार फलंदाजी करणाऱ्या अक्षर पटेलला 34 धावांवर पॅव्हेलियनमध्ये पाठवले. त्यानंतर त्याने धोकादायक दिसणाऱ्या ऋषभ पंतला 9 धावांवर बाद केले.


भारताला 145 धावांचे लक्ष्य मिळाले


बांगलादेशच्या दुसऱ्या डावात लिटन दास (73) याने अर्धशतक झळकावले आणि लिटन दासच्या आधी झाकीर हसन (51) याने पहिले कसोटी अर्धशतक पूर्ण केले. हसनने शेवटच्या सामन्यात एंन्ट्री केल्यानंतर त्याने शतक पूर्ण केले. मोहम्मद सिराजने लिटन दास आणि तस्किनची अर्धशतकी भागीदारी मोडली. सिराजने 67 व्या षटकात लिटन दासला क्लीन बॉलिंग देऊन 76 चेंडूत 60 धावांची भागीदारी मोडली. लिटन दासच्या खेळीच्या जोरावर बांगलादेशने भारताला 145 धावांचे लक्ष्य दिले. भारताकडून दुसऱ्या डावात अक्षर पटेलने 3, मोहम्मद सिराज आणि रविचंद्रन अश्विनने 2-2 बळी घेतले.


वाचा  : कोण चालवणार धोनीचा वारसा? 'या' खेळाडूच्या गळ्यात पडणार कॅप्टन्सीची माळ! 


गोलंदाजांनी चमत्कार केला


बांगलादेशने पहिल्या डावात 227 धावा केल्या. बांगला संघाकडून मोमिनुल हकने सर्वाधिक 84 धावा केल्या. बाकीचे फलंदाज भारतीय गोलंदाजांसमोर टिकू शकले नाहीत. सरतेशेवटी मुशफिकर रहीम आणि लिटन दास यांनी विकेटवर टिकून राहण्याचा प्रयत्न केला, मात्र यश मिळू शकले नाही आणि बांगलादेश संघाची फलंदाजी पत्त्यासारखी विखुरलेली दिसत होती. भारताकडून उमेश यादव आणि रविचंद्रन अश्विनने प्रत्येकी चार बळी घेतले. जयदेव उनाडकटने दोन गडी बाद केले.


पंत-अय्यरची शानदार खेळी


भारतीय संघाने पहिल्या डावात 314 धावा केल्या होत्या. टीम इंडियासाठी श्रेयस अय्यर आणि ऋषभ पंत यांनी शानदार खेळी केली. पंतने 93 धावा केल्या, मात्र त्याचे शतक हुकले. त्याचवेळी श्रेयस अय्यरने 87 धावांचे योगदान दिले. या दोघांमुळे टीम इंडिया मोठी धावसंख्या उभारण्यात यशस्वी ठरली. विराट कोहली आणि चेतेश्वर पुजाराने 24-24 धावा केल्या. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेत विराट कोहलीला अप्रतिम खेळ दाखवता आला नाही. पंत आणि श्रेयस अय्यरमुळे भारताला 87 धावांची आघाडी मिळाली. बांगलादेशकडून शाकिब अल हसन आणि तैजुल इस्लामने 4-4 विकेट घेतल्या. तस्किन अहमद आणि मेहदी हसन यांना 1-1 विकेट मिळाली.