दुसऱ्या वनडेत भारताची ऑस्ट्रेलियावर मात
ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताचा विजय
राजकोट : ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या दुसऱ्या सामन्यामध्ये भारताने विजय मिळवला आहे. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ३६ रनने पराभूत केलं आहे. तीन सामन्यांच्या या सीरीजमध्ये दोन्ही संघ आता १-१ ने बरोबरीवर आहेत. सीरीजमधील शेवटचा आणि निर्णायक सामना १९ जानेवारीला बंगळुरुमध्ये होणार आहे.
ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकत आधी बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या सामन्यात झालेल्या पराभवामुळे हा सामना भारतासाठी जिंकणं महत्त्वाचं होतं. भारतीय टीमने चांगली सुरुवात करत धावांचा डोंगर उभा केला. टीम इंडियाने ५० ओव्हरमध्ये ६ विकेट गमवत ३४० रन केले.
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ ४९.१ ओव्हरमध्ये ३०४ रनवर ऑलआऊट झाली. या मैदानावर हा भारताचा पहिला विजय आहे. याआधी २०१३ मध्ये इंग्लंडने आणि २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिकेने पराभूत केलं होतं.
भारताकडून ओपनर शिखर धवनने ९६ रन, रोहित शर्माने ४२ रन केले. पहिल्या विकेटसाठी १३.३ ओव्हरमध्ये दोघांनी ८१ रनची पार्टनरशिप केली. रोहित शर्मानंतर कर्णधार विराट कोहली मैदानावर आला. चौथ्या क्रमाकांवर येणारा विराट या सामन्यात तिसऱ्या स्थानी खेळायला उतरला. धवनसोबत त्याने भारताचा स्कोर १८४ रन पर्यंत पोहोचवला. त्यानंतर धवन आउट झाला.
चौथ्या स्थानी आलेल्या श्रेयस अय्यरने ७ रन केले. केएल राहुल पाचव्या स्थानी आला. त्याने ५२ बॉलमध्ये ८० रन केले. रवींद्र जडेजाने १६ बॉलमध्ये २० रन केले. ऑस्ट्रेलियाकडून स्पिनर एडम जम्पाने ३ विकेट घेतले.
ऑस्ट्रेलियाकडून स्टीव स्मिथने ९८, मार्नस लॅबुशेनने ४६ रन केले. भारताकडून मोहम्मद शमीने सर्वाधिक तीन विकेट घेतले. रवींद्र जडेजा, कुलदीप यादव आणि नवदीप सैनीने प्रत्येकी दोन-दोन विकेट घेतल्या.