केप टाऊन : दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवत भारतानं इतिहास घडवला आहे. केप टाऊनमध्ये खेळवण्यात आलेल्या या वनडेमध्ये भारताचा १२४ रन्सनी विजय झाला आहे. विराट कोहलीच्या दीडशतकानंतर भारतानं आफ्रिकेला विजयासाठी ३०४ रन्सचं आव्हान ठेवलं होतं. पण भारताच्या स्पिन बॉलिंगपुढे दक्षिण आफ्रिकेच्या बॅट्समननी पुन्हा लोटांगण घातलं. दक्षिण आफ्रिकेचा डाव १७९ रन्सवर संपुष्टात आला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसऱ्या वनडेमध्ये ५ विकेट घेणाऱ्या युझवेंद्र चहलनं या मॅचमध्ये ४ विकेट्स घेतल्या. तर कुलदीप यादवलाही ४ विकेट घेण्यात यश आलं. जसप्रीत बुमराहला २ विकेट मिळाल्या. या विजयासोबतच भारतानं दक्षिण आफ्रिकेच्या मैदानात इतिहास घडवला आहे. दक्षिण आफ्रिकेच्या भूमीवर वनडे सीरिजमध्ये ३-०ची आघाडी भारतानं पहिल्यांदाच घेतली आहे.


डरबनच्या पहिल्या वनडेमध्ये भारताचा सहा विकेट्सनं तर सेंच्युरिअनमधल्या दुसऱ्या वनडेमध्ये भारताचा ९ विकेट्सनं दणदणीत विजय झाला होता. याआधी फक्त दोनच वेळा १९९२-९३ आणि २०१०-११मध्ये भारतानं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध त्यांच्याच जमिनीवर एका सीरिजमधल्या दोन वनडे जिंकल्या होत्या. दोन वनडे जिंकल्या तरी सीरिज मात्र भारताला गमवावी लागली होती.


भारताचा धावांचा डोंगर


विराट कोहलीनं लगावलेल्या खणखणीत शतकामुळे ५० ओव्हरमध्ये भारताचा स्कोअर ३०३/६ एवढा झाला. विराट कोहली १६० रन्सवर नाबाद राहिला. विराटच्या या खेळीमध्ये १२ फोर आणि २ सिक्सचा समावेश होता. विराट कोहलीचं वनडे क्रिकेटमधलं हे ३४वं शतक आहे.


या मॅचमध्ये टॉस जिंकून दक्षिण आफ्रिकेनं पहिले बॉलिंगचा निर्णय घेतला. पहिले बॅटिंग करणाऱ्या भारताला सुरुवातीलचा रोहित शर्माच्या रुपात पहिला धक्का लागला. रोहित शर्मा शून्य रनवर आऊट झाला. यानंतर विराटनं शिखर धवनच्या मदतीनं भारताचा डाव सावरायला सुरुवात केली. शिखर धवन ६३ बॉल्समध्ये ७६ रन्स केले.


कोहली आणि शिखर धवनमधल्या पार्टनरशीपनंतर मात्र कोणत्याच भारतीय बॅट्समननं विराटला साथ दिली नाही. अजिंक्य रहाणे(११), हार्दिक पांड्या(१४), धोनी(१०) आणि केदार जाधव(१) लवकर आऊट झाले. विराटबरोबर भुवनेश्वर कुमार १६ रन्सवर नाबाद राहिला. दक्षिण आफ्रिकेकडून डुमनीनं सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या. तर रबाडा, मॉरिस, पेहलुक्वायो आणि ताहिरला प्रत्येकी एक विकेट मिळाली.