India World Cup Squad : वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची आज घोषणा; `हे` 15 खेळाडू फिक्स?
India World Cup Squad Announcement 2023: बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्त्यांनी खेळाडूंची यादी तयार केलीये. दुपारी दीड वाजता टीमची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी वर्ल्डकपसाठी कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
India World Cup Squad Announcement 2023: सध्या एशिया कप सुरु असून येत्या ऑक्टोबरपासून आयसीसी वनडे वर्ल्डकपला ( ODI World Cup 2023 ) सुरुवात होणार आहे. मंगळवारी वर्ल्डकपसाठी टीम इंडियाची निवड होणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयच्या मुख्य निवडकर्त्यांनी खेळाडूंची यादी तयार केलीये. दुपारी दीड वाजता टीमची घोषणा होण्याची शक्यता आहे. दरम्यान यावेळी वर्ल्डकपसाठी कोणत्या खेळाडूंची वर्णी लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
आयसीसीच्या ( ICC ) नियमांप्रमाणे, वर्ल्डकपमध्ये सहभागी होणाऱ्या सर्व देशांना 5 सप्टेंबरपर्यंत त्यांच्या टीमची घोषणा करायची आहे. या टीममध्ये 27 सप्टेंबरपर्यंत बदल केले जाऊ शकतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, आशिया कपच्या भारत-पाकिस्तान सामन्यानंतर कर्णधार रोहित शर्मा, प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मुख्य निवडकर्ता अजित आगरकर यांच्यात बैठक झाली. या बैठकीत टीम निश्चित झाली असून आता निवड झालेल्या खेळाडूंच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आलीये.
या खेळाडूंना वर्ल्डकप स्क्वॉडमध्ये जागा मिळणं कठीण
आशिया कप स्पर्धेतील पहिले दोन सामने खेळू न शकलेल्या केएल राहुलची वर्ल्डकमध्ये ( ODI World Cup 2023 ) निवड होण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे आशिया कपसाठी निवड झालेला विकेटकीपर फलंदाज संजू सॅमसन, वेगवान गोलंदाज प्रशांत कृष्णा आणि युवा फलंदाज तिलक वर्मा यांना वर्ल्डकपच्या टीममध्ये जागा मिळण्याची शक्यता कमी आहे.
चहलला मिळणार का संधी?
भारताचा अनुभवी स्पिनर युझवेंद्र चहलचं वर्ल्डकप खेळण्याचं स्वप्न भंगू शकतं. गरज पडल्यास टीममध्ये अक्षर पटेलच्या नावाचा विचार केला जाऊ शकतो. त्यामुळे चहलला पुन्हा एकदा वर्ल्डकप खेळण्यासाठी प्रतीक्षा करावी लागणार आहे. 2019 मध्येही त्याची निवड झाली नव्हती.
या खेळाडूंना स्थान मिळणं जवळपास निश्चित
वर्ल्डकपसाठी कर्णधार रोहित शर्मा, शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर आणि सूर्यकुमार यादव या पाच फलंदाजांची निवड होण्याची शक्यता आहे. तसंच इशान किशनसोबत केएल राहुलची यष्टिरक्षक म्हणून निवड होण्याची चिन्ह दिसतायत. उपकर्णधारपदाची माळ हार्दिक पांड्याच्या गळ्यात पडणार असून त्याच्याशिवाय रवींद्र जडेजा, अक्षर पटेल आणि शार्दुल ठाकूर हे खेळाडू गोलंदाजी डिपार्टमेंट सांभाळतील.
वर्ल्डकपसाठी भारताची संभाव्य टीम
फलंदाज- रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव
विकेटकीपर- केएल राहुल, ईशान किशन
ऑलराऊंडर- हार्दिक पांड्या (उपकर्णधार), रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर
गोलंदाज- जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, कुलदीप यादव