टोकियो : ऑलिम्पिकमधून भारतीय क्रीडाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय कुस्तीपटू रवि कुमार दहियाने फायनलमध्ये धडक मारली आहे. 57 किलो वजनी गटात रवि कुमार दहियाने कझाकस्तानच्या नूरीस्लाम सनायेवचा पराभव केला. रवि कुमारने फायनलमध्ये धडक मारल्याने भारताने आणखी पदक निश्चित केलं आहे. पहिल्या फेरीत रवि कुमार पिछाडीवर होता. 5- 9 अशा पिछाडीवर पडलेल्या रवीकुमारनं तीन महत्त्वाचे गुण कमावले. आणि दमदार कामगिरी करत रवि कुमारने कझाकिस्तानच्या मल्लाला चीतपट केलं.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

याआधी क्वार्टर फायनलमध्ये रवि कुमार दहियाने बुल्गेरियाच्या वॅलिंटिनोवचा 14-4 असा पराभव केला. आक्रमक खेळाच्या जोरावर सामन्याच्या सुरुवातीलाच रवीकुमारने वॉलिंटिनोववर आघाडी मिळवली आणि ती शेवटपर्यंत टीकवली. रवी कुमारच्या डावपेचांसमोर बुल्गेरियन कुस्तीपटूचा निभाव लागला नाही.  


टोकियो ऑलिम्पिकमधील हे भारताचे चौथे पदक ठरणार आहे. याआधी वेटलिफ्टिंगमध्ये मीराबाई चानूने सिल्व्हर, बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधूने ब्राँझ तर बॉक्सर लव्हलिन बोर्गोहेनने ब्राँझ पदक पदक जिंकून दिलं आहे.