`संघातील अनेक खेळाडू माझी...`, रोहित शर्माने पहिल्यांदाच सांगितलं निवृत्तीमागील खरं कारण, `मी आजही सहज....`
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून (T20 internationals) निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून (T20 internationals) निवृत्ती जाहीर करत सर्वांना आश्चर्याचा धक्का दिला होता. शनिवारी रोहित शर्माने जितेंद्र चौक्सीच्या युट्यूब चॅनेलवर मुलाखत देताना सांगितलं की, "मी 500 आंतरराष्ट्रीय सामने खेळण्याच्या जवळ पोहोचलो आहे आणि अनेक खेळाडूंना ही कामगिरी करता आलेली नाही. इतकं क्रिकेट खेळताना तुमचा फिटनेस महत्त्वाचा असतो, जो महत्वाची भूमिका निभावतो".
"17 वर्षं आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 500 सामने खेळण्याच्या मी अगदी जवळ आहे," असं रोहित शर्माने फिटनेसवर बोलताना सांगितलं. पुढे तो म्हणाला की, "आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक खेळाडूंना 500 सामने खेळण्यास जमलेलं नाही. इतका काळ खेळताना तुमचा दिनक्रम, तुम्ही कसं खेळता, फिटनेस कसा ठेवता, तुम्ही मेंदूला कसं मॅनेज करता, स्वत:ला ट्रेन कसं करता आणि सर्वांत विशेष म्हणजे तुम्ही सामन्यासाठी कसे तयार होता या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. दिवसाच्या शेवटी सामन्यासाठी 100 टक्के तयार राहणं आणि सामने जिंकण्यासाठी खेळणं हे आमचं काम आहे, त्यामुळे तयारी करताना फिटनेस महत्त्वाचा असतो".
रोहित शर्माने यावेळी उघड केलं की जूनमध्ये टी-20 वर्ल्डकप विजेतेपद जिंकल्यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली कारण, त्याला ती योग्य वेळ आहे असं वाटलं. संघात अनेक चांगले खेळाडू आहेत जे भारतासाठी चांगली कामगिरी करु शकतात असंही रोहित शर्माने सांगितलं.
"मी टी-20 मधून निवृत्ती घेण्याचं एकमेव कारण माझी वेळ आली होती. मला या फॉरमॅटमध्ये खेळताना फार मजा आली. मी 17 वर्षं खेळलो आणि चांगली कामगिरी केली. विश्वचषक जिंकल्यानंतर, हे ठरवण्याची माझ्यासाठी सर्वोत्तम वेळ होती. माझ्यासाठी पुढे जाण्याची आणि इतर गोष्टींकडे लक्ष देण्याची वेळ आली आहे. भारतीय संघात असे अनेक खेळाडू आहेत जे भारतासाठी चांगली कामगिरी करू शकतात. मला काही वाटलं म्हणून नाही तर ती योग्य वेळ आहे अशी जाणीव झाल्यानेच निवृत्ती घेतली," असं रोहित शर्मा म्हणाला.
पुढे त्याने सांगितलं की, "मी आजही तिन्ही फॉरमॅटमध्ये सहज खेळू शकतो. त्यामुळे मी म्हणतो फिटनेस हा सर्व तुमच्या डोक्यात असतो. तुम्ही तुमच्या मेंदूला कसं ट्रेन करता यावर सर्व अवलंबून आहे. मी एका असा व्यक्ती आहे ज्य़ाचा स्वत:वर फार विश्वास आहे. कारण जेव्हा गरज लावते तेव्हा मी माझ्या मेंदूवर नियंत्रण आणू शकतो. काही वेळा हे शक्य होत नाही. पण अनेक वेळा शक्य होतं".
रोहितने टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. रोहितने आपल्या टी-20 कारकिर्दीत दोन वर्ल्डकप जिंकले. 2007 मध्ये एक तरुण खेळाडू असताना तो विजयी संघाचा भाग होता. 151 T20I सामन्यांमध्ये, रोहितने 140 पेक्षा जास्त स्ट्राइक रेटसह 32.05 च्या सरासरीने 4,231 धावा केल्या आहेत. त्याने आपल्या कारकिर्दीत 121 च्या सर्वोत्कृष्ट स्कोअरसह पाच शतके आणि 32 अर्धशतके केली आहेत. या फॉरमॅटमध्येही रोहित सर्वाधिक धावा करणारा फलंदाज आहे.