नवी दिल्ली : भारतीय क्रिकेच संघात एक नवी पहाट आणणाऱ्या आणि संघाच्या कर्णधारपदी असताना क्रीडा विश्वात संघाला उल्लेखनीय स्थान मिळवून देणाऱ्या महेंद्रसिंह धोनी याच्यासाठी यंदाचा क्रिकेट विश्वचषक खास आहे. क्रीडारसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या धोनीचा आज वाढदिवस. ऐन विश्वचषकाच्याच दिवसांमध्ये वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाल्यामुळे खऱ्या अर्थाने धोनीचा आनंद द्विगुणित झाला असणार यात शंका नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीलंकेच्या संघावर विजय मिळवणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाने उपांत्य फेरीत धडक मारली आणि एका प्रकारे धोनीला वाढदिवसाची खास भेट दिली. सध्याच्या घडीला क्रिकेट विश्वचषकामध्ये व्यग्र असणाऱ्या धोनीचा वाढदिवस संघातर्फे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी संघातील सर्व खेळाडू, सपोर्टींग स्टाफ आणि धोनीच्या कुटुंबाचीही उपस्थिती पाहायला मिळाली. 



बहुगुणी धोनी... 


प्रत्येक प्रकारात भारतीय संघाला जेतेपद मिळवून देणारा धोनी 
क्रिकेट इतिहासामध्ये प्रत्येक धाटणीच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली उल्लेखनीय कामगिरी केली आहे. ज्यामध्ये ICCT20 विश्वचषक, २०११ एकदिवसीय क्रिकेट विश्वचषक, २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी यावर त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने मोहोर उमटवली. 


वेगवान यष्टीरक्षक
धोनीने आतापर्यंत ३४९ सामन्यांमध्ये यष्टीरक्षण केलं असून, प्रत्येक वेळी त्याची अफलातून कामगिरी पाहायला मिळाली आहे. त्याने या सामन्यांमध्ये आतापर्यंत १२२ खेळाडूंचा स्टंपिंगने बळी घेतला आहे. अशी किमया करणारा धोनी हा एकमेव खेळाडू आहे. तर, भारताच्या वतीने सर्वाधिक म्हणजेच ३१२ झेल घेण्यासाठीही त्याचं नाव घेतलं जातं. 


सर्वाधिक षटकार लगावणारा कर्णधार 
क्रिकेटच्या इतिहासात धोनीच्या फलंदाजीचीही जोरदार प्रशंसा केली जाते. भारतीय क्रिकेट इतिहासातील तो एकमेव असा कर्णधार आहे, ज्याने सर्वाधिक षटकार लगावले आहेत. कर्णधारपदी असताना त्याने कसोटी सामन्यांमध्ये ४८, एकदिवसीय सामन्यांमध्ये २२८ आणि टी२० क्रिकेट सामन्यांमध्ये ५२ षटकार लगावले आहेत. 


सर्वाधिक वेळा नाबाद राहणारा खेळाडू 
मॅच फिनिशर म्हणून धोनीचा नावलौकिक आहे. परिणामी एकदिवसीय सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा नाबाद राहण्याचा विक्रमही त्याच्या नावे आहे. आतापर्यंत तो १०० सामन्यांमध्ये नाबाद राहिला आहे.