WTC 2023: लाजिरवाण्या पराभवानंतर गांगुली आणि हरभजनच्या तिखट प्रश्नांना राहुल द्रविडची उत्तरं, म्हणाला `काही खेळाडू..`
WTC Final: जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) लाजिरवाणा पराभव झाला. यानंतर भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडने (Rahul Dravid) सविस्तर मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत सौरव गांगुली (Sourav Ganguly) आणि हरभजन सिंग (Harbhajan Singh) यांनी राहुल द्रविडवर तिखट प्रश्नांचा मारा केला.
WTC Final: जागतिक कसोटी अजिंक्यपद (World Test Championship) स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भारताचा ऑस्ट्रेलियाविरोधात (Australia) झालेल्या लाजिरवाण्या पराभवानंतर माजी कर्णधार सौरव गांगुली आणि हरभजन सिंग यांनी भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक राहुल द्रविडवर (Rahul Dravid) प्रश्नांचा मारा केला. ऑस्ट्रेलियाने भारताचा तब्बल 210 धावांनी पराभव केला. भारताने टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याने त्यावरुन टीकेची झोड उठली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात 469 धावा केल्या होत्या. दुसऱ्या डावानंतर भारतसामोर 444 धावांचं आव्हान होतं. पण भारतीय संघ 234 वर ऑल आऊट झाला.
राहुल द्रविड याने हा फार मोठा पराभव असल्याचं मान्य करत संघ शेवटचा दिवस संपेपर्यंत खेळू शकला नाही अशी खंत व्यक्त केली आहे. पाचव्या दिवसाच्या पहिल्या सत्रात भारताने सात गडी गमावले होते. या सामन्यात भारतीय फलंदाजी सपशेल अपयशी ठरल्याचं दिसलं.
"हो हे फार कठीण होतं. परिस्थिती कितीही कठीण असली तरी आपण त्याच्याशी लढा देत असल्याचं आपण पाहिलं आहे. आपण झुंज देत कमबॅक केल्याचं भुतकाळात पाहिलं आहे. आम्ही दोन दिवस चांगला लढा दिला. पण आम्हाला एका चमकदार, अपवादात्मक कामगिरीची गरज होती," असं राहुल द्रविडने म्हटलं आहे.
"ही 469 धावा होणारी खेळपट्टी नव्हती. आम्ही लोअर मिडल ऑर्डरमध्ये धावा दिल्या. आम्हाला कोणत्या लाइनवर गोलंदाजी करायची आहे याचा अंदाज होता. पण आम्ही योग्य ठिकाणी गोलंदाजी केली नाही. काही फटके खेळताना आम्ही काळजी घेण्याची गरज होती," असं राहुल द्रविडने सांगितलं आहे.
दरम्यान, सौरव गांगुलीने राहुल द्रविडला टॉस जिंकल्यानंतर प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय का घेतला? अशी विचारणा केली. "राहुल मी आज तुझ्याशिवाय फार क्रिकेट खेळलो आहे. तू भारतीय संघाचं नेतृत्वही केलं आहेस. मी तुझ्यासोबत इतकं खेळलो आहे आणि आपण नेहमीच कसोटी सामन्याच्या 5 व्या दिवशी नव्हे तर सुरुवातीला दबाव घेऊ अशी चर्चा करतो," असं सौरव गांगुली म्हणाला.
त्यावर उत्तर देताना राहुल द्रविडने सांगितलं की "असं काही नाही, आम्ही आलो तेव्हा मैदानावर गवत होतं. तसंच वातावरण ढगाळ होतं. अशा स्थितीत जसजसा खेळ पुढे जातो, तशी फलंदाजी सहज होते. अनेक सामन्यात आपण हे पाहिलं आहे".
सौरव गांगुलीने पुढे सागंतिलं की, "जेव्हा तुम्ही टॉप ऑर्डर पाहता, तेव्हा सरासरी खूपच कमी आहे आणि ती कमी करणे आवश्यक आहे. ही समस्या लवकरच सोडवण्याची गरज आहे". त्यावर राहुलने म्हटलं की "अनेक चांगले खेळाडू 5 आणि 6 व्या क्रमांकावर खेळत आहेत. 3, 4 आणि 6 व्या क्रमांकावरील खेळाडू हाय-प्रोफाइल अशून त्यांना लिजंड म्हटलं जाईल. ते चांगले परफॉर्मर आहेत आणि मला खात्री आहे की जेव्हा ते पाहतील तेव्हा हा आपला उच्च दर्जाचा खेळ नाही असं त्यांनाही वाटेल".
"जेव्हा आम्ही दक्षिण आफ्रिका किंवा इतर देशांमध्ये खेळलो तेव्हा काही वेळा चांगली परिस्थिती होती. प्रत्येक सामना महत्त्वाचा आहे आणि प्रत्येक सामना जिंकणे आवश्यक आहे. प्रत्येक संघातील प्रत्येक खेळाडूसाठी सरासरी कमी आहे. पण तू म्हणालास, तेही बरोबर आहे. जर आम्ही आमच्या गोलंदाजांसाठी धावांचा डोंगर उभा केला तर ती एक जमेची बाजू आहे. हरभजन आमच्यासाठी खेळायचा आणि आम्ही धावांचा ढीग करायचो तेव्हा त्याला बरे वाटायचे," असं राहुलने सांगितलं.
"भारतात अनेक कसोटी सामने आहेत ज्यामध्ये पहिल्या तासापासून फिरकी गोलंदाजांचा वापर करत 2-3 दिवसात सामना संपवतात. पण परदेशात हाच ट्रेंड आपल्याला त्रासदायक वाटतो का?", अशी विचारणा हरभजन सिंगने केली.
त्यावर राहुलने उत्तर दिलं की "पहिल्याच दिवसापासून चेंडू फिरावा असं कोणालाही वाटत नाही. पण जसजसा दिवस संपू लागतो तेव्हा मात्र चेंडू फिरावा असं वाटतं. ऑस्ट्रेलियाही अशा विकेट्समध्ये खेळत होती, ज्यामध्ये तीन ते चार दिवसात विकेट गमावल्या जातात. मला मान्य आहे की भारताच्या काही विकेट्स कठीण होत्या".
आम्ही चांगली खेळी केली नाही हे मान्य आहे. आम्ही सर्व डेटा, नंबर आणि इतर गोष्टी पडताळून पाहत आहोत असं राहुलने म्हटलं आहे.