मोहम्मद शमी संघात परतणार का? गौतम गंभीरने स्पष्ट केलं, म्हणाला, `मला आधी...`
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे.
एकदिवसीय वर्ल्डकपमध्ये (ODI World Cup) जबरदस्त कामगिरी केल्यानंतर मोहम्मद शमी (Mohammed Shami) दुखापतीमुळे क्रिकेटपासून दूर आहे. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. मोहम्मद शमीने वर्ल्डकपमधील 7 सामने खेळले होते. या 7 सामन्यात त्याने 24 विकेट्स घेतले आणि सर्वाधिक गडी बाद करणारा गोलंदाज ठरला. वर्ल्डकपदरम्यान मोहम्मद शमीच्या घोट्याला दुखापत झाली होती. यानंतर तो क्रिकेटमधून काही काळासाठी बाहेर होता. दरम्यान तो संघात कमबॅक कधी करणार याची चाहत्यांना उत्सुकता आहे. त्यातच भारतीय संघाचा मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने यावर भाष्य केलं आहे.
मोहम्मद शमीच्या गोलंदाजीच्या जोरावर भारताने एकदिवसीय वर्ल्डकपची फायनल गाठली होती. मात्र अखेरच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताचा पराभव करत वर्ल्डकप जिंकण्याचं स्वप्न धुळीस मिळवलं होतं. नुकतीच बीसीसीआयची पत्रकार परिषद पार पडली असून त्याला गौतम गंभीर आणि अजित आगरकरने हजेरी लावली. यावेळी त्यांना मोहम्मद शमी पुन्हा कमबॅक कधी करणार यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला.
"त्याने गोलंदाजी करण्यास सुरुवात केली आहे. पहिला कसोटी सामना 19 सप्टेंबरला आहे. आमचं नेहमी तेच लक्ष्य होतं (तोपर्यंत त्याने कमबॅक करावं). तोपर्यंत तो संघाकडून खेळण्यासाठी पूर्णपणे फिट आहे की नाही यासंदर्भात मला एनसीएमध्ये चर्चा करावी लागेल." असं गौतम गंभीरने सांगितलं.
...म्हणून रविंद्र जडेजाला वगळलं
रवींद्र जडेजाला संघातून वगळण्याबद्दल विचारण्यात आलं असता निवड समितीचा प्रमुख अजित आगरकरने सांगितलं की, "ज्या प्रत्येक खेळाडूला वगळण्यात आलं आहे त्याला वाईट वाटणार. मात्र अनेकदा याला पर्याय नसतो. सर्वांना 15 मध्ये स्थान देणं शक्य होत नाही. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करण्याचा हा सारा खेळ आहे. रिंकूला टी-20 वर्ल्ड कपमध्ये स्थान मिळालं नाही यात त्याचा काही दोष नाही. अक्षर पटेल आणि रविंद्र जडेजा या दोघांनाही संघात स्थान देण्यात अर्थ नव्हता. त्यातही ही मालिका फारच छोटी आहे. त्याला वगळण्यात आलेलं नाही. त्याचा विचार भविष्यातील कसोटी मालिकेसाठी केला जाईल. अजूनही तो फार महत्त्वाचा खेळाडू असून भविष्यात त्याचा नक्कीच विचार होणार आहे".
या कारणामुळे हार्दिकऐवजी लागली सूर्यकुमारची वर्णी
हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवला कर्णधार म्हणून का निवडलं? असा प्रश्न विचारण्यात आला असता आगरकरने निवड समितीला नेमकं काय अपेक्षित होतं हे सांगितलं. हार्दिकऐवजी सूर्यकुमार यादवकडे कर्णधारपद सोपवण्यासंदर्भातील निर्णय का घेतला याविषयी बोलताना आगकरकरने, "आम्हाला असा कर्णधार हवा होता जो सर्व समाने खेळू शकेल. ज्याच्यासारखं कौशल्यं सापडणं कठीण आहे असा कर्णधार आम्ही शोधत होतो. त्याच्यासाठी (हार्दिकसाठी) आरोग्य संभाळणं आव्हानात्मक झालं आहे. त्यामुळे प्रशिक्षक आणि निवड समितीला त्याच्या पाठीशी उभं राहणं कठीण झालं. पुढील टी-20 वर्ल्ड कपपर्यंत आपल्याकडे वेळ आहे. त्याची फिटनेस हे मुख्य आव्हान आहे हे स्पष्टचं आहे. आम्हाला असं कोणीतरी हवं आहे जो बराच काळ उपलब्ध असेल. सूर्यामध्ये ते सर्व गुण आहेत जे एक कर्णधार होण्यासाठी आवश्यक आहेत," असं स्पष्टपणे सांगितलं.