मुंबई : क्रिकेट विश्वातून या क्षणाची सर्वात मोठी बातमी. टीम इंडियाचा (Indian Cricket Team) आक्रमक फलंदाज विराट कोहलीने (Virat Kohli) टी 20, वनडेनंतर आता कसोटी कर्णधारपद (Test Captaincy) सोडलं आहे. विराटने ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे. (indian cricket team virat kohli step down test captaincy after t 20i and odi cricket) 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ट्विटमध्ये काय म्हंटलंय? 


विराटने ट्विटरवर आपल्या कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्याबाबत एक पोस्ट शेअर केली. या पोस्टद्वारे बीसीसीआय, टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री आणि इतर सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत.


विराटची कर्णधार म्हणून कामगिरी


विराटने एकूण 68 कसोटी सामन्यात टीम इंडियाचं प्रतिनिधित्व केलं होतं. विराटने त्यापैकी 40 सामन्यात टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात विजय मिळवून दिला. तर 17 सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला. तर 11 सामने अनिर्णित राखण्यास त्याला कर्णधार म्हणून यश आलं. विराट गेल्या 7 वर्षांपासून टीम इंडियाच्या कसोटी संघाचं नेतृत्व करत होता. 


विराटने टीम इंडियाला आपल्या नेतृत्वात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपच्या अंतिम फेरीत पोहचवलं होतं. मात्र थोडक्यासाठी टीम इंडियाचं वर्ल्ड चॅम्पियन होण्याचं स्वप्न भंगलं होतं. 


आता पुढचा कर्णधार कोण?


दरम्यान विराटने कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने नेतृत्वाची जबाबदारी कोणाकडे दिली जाणार, अशी चर्चा सुरु झाली आहे. सध्या टीम इंडियाचा पूर्ण वेळ उपकर्णधार रोहित शर्मा आहे. मात्र त्याला दुखापत झाल्याने दक्षिण आफ्रिका विरुद्धच्या कसोटी मालिकेत केएल राहुलकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. 


नियमांनुसार, जो उपकर्णधार असतो तोच खेळाडू पूर्णवेळ कर्णधाराच्या अनुपस्थितीत संघाचं नेतृत्व करतो. तसेच जोवर पूर्णवेळ कर्णधारपदी निवड होत नाही तोवर उपकर्णधारच कर्णधार असतो. मात्र आता विराटने राजीनामा दिला आहे. त्यामुळे नियमांनुसार, रोहितलाच टी 20, वनडेनंतर कसोटी संघाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.