महिलांवरील `त्या` वक्तव्यानंतर पांड्या म्हणतो, चूक झाली... माझी
त्यावेळी पांड्याचा वेगळाच अंदाज पाहायला मिळाला होता.
मुंबई : क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि के.एल.राहुल या दोघांनीही काही दिवसांपूर्वी छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. निर्माता- दिग्दर्शक करण जोहर याच्या 'कॉफी विथ करण' या कार्यक्रमात त्या दोघांनीही उपस्थिती लावली होती. त्यावेळी करणच्या प्रश्नांना उत्तर देणाऱ्या के.एल आणि पांड्याचा वेगळाच अंदाजही पाहायला मिळाला.
अशा या कार्यक्रमात गप्पांची फटकेबाजी करत हार्दिक पांड्या याने आपल्या खासगी आयुष्यातील महिलांना दिल्या जाणाऱ्या वागणूकीप्रती जे वक्तव्य केलं त्यामुळे अनेकांच्याच भुवया उंचावल्या. या वक्तव्यामुळे अनेकांचाच रोषही त्याने ओढावला. ज्यानंतर त्याच्यावर टीकेची झो़ड उठली होती. आपल्यावर होणाऱ्या याच टीका पाहता हार्दिकने अखेर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली चूक मान्य करत दिलगिरी व्यक्त केली.
'कॉफी विथ करण या कार्यक्रमात मांडलेल्या माझ्या विचारांमुळे कोणाच्याही भावना दुखावल्या असतील तर मी त्यांची क्षमा मागतो. मी जाणूनबुजून कोणाच्याही भावला दुखावलेल्या नाहीत. मला सर्वांचाच आदर आहे', असं त्याने या पोस्टमध्ये लिहिलं आहे.
असं नेमकं काय म्हणाला होता हार्दिक?
करण जोहरच्या बहुचर्चित चॅट शोमध्ये हार्दिकने त्याच्या अत्यंत खासगी गोष्टींविषयी भाष्य केलं होतं. 'माझ्या सेक्स लाईफबद्दल माझ्या कुटुंबाला काहीच आक्षेप नाही. त्यांच्यासोबत पार्टीला गेलो असताही त्यांनी मला यातल्या कोणत्या मुलीबरोबर 'सिन' केला आहेस, असा प्रश्न विचारला. तेव्हा हिच्याबरोबर, हिच्याबरोबर आणि तिच्याबरोबर, असं उत्तर मी दिलं तरी कुटुंबीयांना माझा अभिमानच आहे', असं तो म्हणाला होता.
इतकच नव्हे तर, व्हर्जिनिटी गमावल्यानंतरही आपण कुटुंबाला सांगितल्याचा खुलासा त्याने या कार्यक्रमात केला होता. शिवाय इतरही बऱ्याच गोष्टींचा त्याने असा काही खुलासा केला जे पाहता त्याचं हे वक्तव्य अनेकांनाच खटकलं होतं.