मुंबई : भारतीय क्रिकेट विश्वात आपल्या दमदार क्रिकेट शैलीने महेंद्रसिंह धोनी याने टप्प्याटप्प्याने स्वत:चं स्थान भक्कम केलं. संघाच्या कर्णधारपदी असणाऱ्या माहीने सुरुवातीच्या काळापासूनच क्रिकेट जगताला आपली दखल घ्यायला भाग पाडलं. कमाईच्या बाबतीतही त्याने कायमच अनेकांना थक्क केलं. अतिशय सर्वसामान्य कुटुंबातून आलेल्या धोनीने त्याचं विश्व उभारलं खरं. पण, तुम्हाला माहितीये का, हे विश्व उभारण्यासाठी त्याची माफक अपेक्षा होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गरजेपुरताच संपत्ती आपल्याकडे असावी, असंच एक स्वप्न त्यानेही बाळगलं होतं. माहीच्या या स्वप्नाचा, या इच्छेचा उलगडा केला आहे भारतीय क्रिकेट संघातील माजी सलामीवीर वसिम जाफर याने. 


सोशल मीडियाच्या वर्तुळात ट्विटरच्या दुनियेत एका नेटकऱ्याच्या प्रश्नाचं उत्तर देत त्याने याविषयीची माहिती दिली. #AskWsim या अनोख्या सत्रात महेंद्रसिंह दोनीसोबतची तुमची एखादी आठवण कोणती? असा प्रश्न त्याला नेटकऱ्याने केला. याच प्रश्नाचं उत्तर देत त्याने एक सुरेख अशी आठवण सांगितली. 


'मला आठवतंय, भारतीय क्रिकेट संघात आल्यानंतर पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षी तो म्हणाला होता, त्याला क्रिकेट खेळून जवळपास ३० लाख रुपयेच कमवायचे होते. म्हणजे तो रांचीमध्ये अगदी शांततेत आयुष्य व्यतीत करु शकेल', असं वसिमने माहिसोबतची आठवण सांगत लिहिलं. 



 


 


धोनीची ही इच्छा खरी झाली. पाहता पाहता त्याने क्रीडा जगतावर राज्यच केलं. रांचीतून निघालेला माही असा वेगाने पुढे आला की त्याचा अनेकांनाच हेवा वाटला. मुख्य म्हणजे कारकिर्दीत उत्तुंग शिखरावर पोहोचूनही धोनीची विनम्र वृत्ती आणि मनमिळाऊ स्वभावच त्याला सर्वांपेक्षा वेगळं ठरवून गेला.