भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने (Rohit Sharma) टी-20 वर्ल्डकप (T20 World Cup) विजेत्या संघातील खेळाडूंसह 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये (The Great Indian Kapil Show) हजेरी लावली. यावेळी त्यांनी चाहत्यांचं भरपूर मनोरंजन केलं. जून महिन्यात झालेल्या टी-20 वर्ल्डकपच्या अंतिम सामन्यात भारताने दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत दुसऱ्यांदा वर्ल्डकप जिंकण्याची किमया केली. भारताने 7 धावांनी दक्षिण आफ्रिकेचा पराभव करत आयसीसी ट्रॉफी न जिंकण्याचा 11 वर्षांचा दुष्काळ संपवला. टी-20 वर्ल्डकप विजयानंतर संपूर्ण देशात विजयोत्सव साजरा करण्यात आला होता. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही भारतीय संघाची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली होती.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

रोहित शर्मा, अर्शदीप सिंग, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि अक्षर पटेल यांनी 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये हजेरी लावत पुन्हा एकदा टी-20 वर्लडकप विजयाच्या आठवणींना उजाळा दिला. यावेळी खेळाडूंनी कार्यक्रमातील वेगवेगळ्या खेळांमध्ये भाग घेतला ज्यामुळे प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. 


शोमध्ये एक खेळ होता, ज्यामध्ये रोहित शर्माला समोरील खेळाडू कोणत्या खेळाडूचा अभिनय करत आहे हे ओळखायचं होतं. रोहित शर्मा न पाहता कागदावरील नाव दाखवणार, आणि समोरील खेळाडूने त्याचा अभिनय करायचा असा खेळ होता. यावेळी शिवम दुबेला विराट कोहलीची नकल करायची होती. रोहित शर्माने विराटचं नाव घेतलं, पण शिवम दुबेचा अभिनय पाहून त्याची खिल्ली उडवली. 'माफ कर, पण तुझा अभिनय फार घाणेरडा होता,' असं रोहित शर्माने सांगताच सर्वजण हसू लागले.



याव्यतिरिक्त, यष्टीरक्षक फलंदाज ऋषभ पंतने खेळाचा वेग कमी करण्यासाठी एक युक्ती केली, ज्यामुळे वेग कमी झाला. त्यामुळे दक्षिण आफ्रिकेच्या फलंदाजांची लय तुटली असंही रोहित शर्माने सांगितलं. 


"जेव्हा दक्षिण आफ्रिकेला 30 चेंडूत 30 धावांची गरज होती, त्याआधी एक छोटासा ब्रेक होता. पंतने आपल्या चातुर्याचा वापर करत खेळ काही वेळासाठी थांबवला. त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती, त्यामुळे त्याच्यावर पट्टी लावली होती. यामुळे खेळाचा वेग कमी होण्यास मदत झाली. कारण खेळ फार वेगवान होता, आणि त्या क्षणी, सर्व फलंदाजांना लवकर गोलंदाजी व्हावी असं वाटत होतं. पण मी फिल्डिंग लावत असताना आणि गोलंदाजांशी बोलत असताना अचानक मला पंत मैदानात खाली पडलेला दिसला," असं रोहितने सांगितलं.


"फिजिओथेरपिस्ट आला आणि त्याच्या गुडघ्याला टेप लावत होता. क्लासेन सामना पुन्हा सुरू होण्याची वाट पाहत होता. मी असं म्हणत नाही की हे  जिकण्याचं एकमेव कारण आहे, परंतु हे त्यापैकी एक असू शकते. पंतने त्याची हुशारी वापरली आणि गोष्टी आमच्या बाजूने गेल्या," असंही रोहित म्हणाला.