भारतीय क्रिकेट संघाने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेत बांगलादेशला क्लीन स्वीप दिला आहे. दुसरा कसोटी सामना कानपूरमध्ये झाला, जो भारताने सात गडी राखून जिंकला. पाऊस पडल्यानंतर दोन दिवस वाया जाऊनही भारताने जबरदस्त फलंदाजी करत बांगलादेशला पराभूत केलं आणि दोन्ही कसोटी सामने जिंकले. पहिला कसोटी सामना भारताने 280 धावांनी जिंकला होता. या विजयानंतर भारतीय स्टार विराट कोहलीने बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसनला विशेष बॅट भेट म्हणून दिली. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विराट कोहलीने शाकिब अल हसनच्या आतापर्यंतच्या करिअरचा सन्मान करत ही भेट दिली. हा कसोटी सामना कदाचित त्याच्या कसोटी कारकिर्दीतील अखेरचा सामना होता. यामुळे त्याचा सन्मान म्हणून विराट कोहलीने त्याला ही बॅट दिली. या बॅटवर विराट कोहलीने स्वाक्षरी केली होती. 


कानपूर कसोटीच्या अगोदर शाकिब अल हसनने भारताविरुद्धची दुसरी कसोटी कदाचित त्याची शेवटची असेल असे संके दिले होते. बांगलादेशमध्ये घरच्या कसोटी सामन्यांसाठी त्याची निवड होणार नाही असं तो म्हणाला होता. त्याच्या या विधानाने निवृत्तीच्या चर्चांना जोर दिला होता. विजयानंतर भारतीय संघ एकीकडे सेलिब्रेशन करत असताना दुसरीकडे विराट कोहली शाकिबशी मैत्रीपूर्ण संवाद साधताना दिसला. यादरम्यान विराटने शाकिबला बॅट भेट दिली. 



शाकिब अल हसनने टी-20 मधून आधीच निवृत्ती घेतली आहे. शाकिब आता चॅम्पिअन्स ट्रॉफी 2025 नंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याच्या तयारीत आहे. 


हत्येचा आरोप


शाकिब अल-हसन नेहमीच वादात अडकलेला असतो. अनेक क्षणी त्याने मैदानावर आपला संताप व्यक्त केला आहे. त्याच्यावर हत्येचाही आरोप आहे. बांगलादेशात सत्तांतर झालं तेव्हा आंदोलनादरम्यान रुबेल नावाच्या एका तरुणाचा मृत्यू झाला होता. यानंतर मृत तरुणाच्या वडिलांनी शाकिबविरोधात ढाकाच्या अदबोर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला. शाकिब अल हसन शेख हसीना यांच्या आवामी पक्षाचा खासदारही आहे. 


शाकिबने 71 कसोटी सामन्यांमध्ये 4609 धावा आणि 246 विकेट्स घेतल्या आहेत. शाकीब बांगलादेशच्या महान क्रिकेटपटूंपैकी एक आहे. त्याच्या अष्टपैलू क्षमतांनी त्याला केवळ बांगलादेशसाठीच नव्हे तर जागतिक स्तरावर ओळख मिळवून दिली आहे.