एंटिगा : भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यातल्या २ टेस्ट मॅचच्या सीरिजला आजपासून सुरुवात होणार आहे. सीरिजची पहिली टेस्ट एंटिगामध्ये खेळवण्यात येत आहे. या सीरिजपासून दोन्ही टीमच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपला सुरुवात होईल. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप असल्यामुळे टेस्ट खेळणाऱ्या सगळ्या टीमच्या जर्सीमध्ये बदल करण्यात आले आहेत. वर्ल्ड टेस्ट सीरिजमध्ये प्रत्येक खेळाडूच्या जर्सीवर नंबर दिसणार आहेत. याआधी फक्त वनडे आणि टी-२०मध्येच खेळाडूच्या जर्सीवर नंबर असायचे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

गुरुवारपासून सुरू होणाऱ्या टेस्ट सीरिजमध्ये भारतीय टीमही नंबर असलेल्या जर्सीसह मैदानात उतरणार आहे. या नव्या जर्सीवर भारतीय खेळाडूंनी प्रतिक्रिया दिली आहे. 'जर नव्या जर्सीमुळे प्रेक्षक टेस्ट क्रिकेटकडे आकर्षित होणार असतील, तर आम्हाला ही जर्सी घालायला काहीच अडचण नाही,' असं अश्विन म्हणाला. तसंच नवीन जर्सी चांगली दिसत आहे, अशी प्रतिक्रिया बुमराहने दिली.



चेतेश्वर पुजारा बराच कालावधी काऊंटी क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याला अशा जर्सीची सवय आहे. 'मर्यादित ओव्हरच्या सामन्यांमध्ये जर्सीवर मागे खेळाडूंचं नाव आणि नंबर लिहिलेला असतो. प्रेक्षकांना खेळाडू ओळखण्यात यामुळे मदत होते. खेळाडूंसाठीही हे चांगलं आहे, कारण प्रत्येक खेळाडूकडे आता टेस्ट जर्सी नंबर असेल,' असं वक्तव्य चेतेश्वर पुजाराने केलं.



भारताचा ओपनर केएल राहुलनेही नव्या जर्सीबद्दल त्याचं मत मांडलं आहे. 'आम्ही सगळ्यांनी दाढी वाढवल्यामुळे नक्की मैदानात कोण आहे, हे प्रेक्षकांना ओळखता यायचं नाही. हेल्मेट घातल्यानंतर नेमका कोणं बॅटिंग करत आहे, ते तुम्हाला बघता यायचं नाही,' असं राहुल म्हणाला.