नवी दिल्ली : भारतीय नौसेनेनं हरियाणाचा ऑल राऊंडर क्रिकेटपटू आणि अॅक्टिंग पॅटी ऑफिसर दीपक पूनियाविरोधात अटक वॉरंट जारी केला आहे. दीपक एनओसीशिवाय हरियाणाकडून रणजी क्रिकेट खेळतो आहे. २४ ऑक्टोबरला जारी करण्यात आलेल्या वॉरंटमध्ये कमांडर एमएमएस शेरगिल, आयएनएस अंगेरेचे कमांडिंग ऑफिसर यांनी हरियाणा आणि मुंबई पोलीस आणि डीएनपीएम दिल्ली यांना पूनियाला अटक करण्याचे अधिकार दिले आहेत.


'दीपककडून कायद्याचं उल्लंघन'


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दीपक पूनियानं नेव्ही अॅक्ट १९५७चं उल्लंघन केल्यामुळे त्याला अटक करण्यात यावी, असं या वॉरंटमध्ये लिहिण्यात आल्याची बातमी इंडियन एक्सप्रेसनं दिली आहे. २४ वर्षांचा दीपक पूनिया २०१४मध्ये नौसेनेत दाखल झाला होता. दीपकनं याआधी रणजीचे दोन मोसम सौराष्ट्रकडून खेळले तर या मोसमात तो हरियाणाचं प्रतिनिधीत्व करत आहे. दीपक आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सच्या टीमचा हिस्सा होता. हरियाणाकडून दोन मॅच खेळल्यावर पूनियाला अटक वॉरंट देण्यात आलं आहे.


सर्व्हिस स्पोर्ट्स कंट्रोल बोर्ड (एसएससीबी)चे सचिव सत्यव्रत शेरून यांनी बीसीसीआयला पत्र पाठवलं आहे. दीपक पूनियाचं एनओसी संपलेलं आहे, त्यामुळे त्याला पुन्हा पेरेंट डिपार्टमेंटमध्ये पाठवण्यात येत असल्याचं या पत्रात सांगण्यात आलंय. २०१६-१७ साठी देण्यात आलेल्या एनओसीलाच बीसीसीआयनं या मोसमासाठी मंजूर करण्यात आल्याचा आरोप पत्रात करण्यात आलाय.


बीसीसीआयनं आरोप फेटाळले


पूनियानं सौराष्ट्रकडून एनओसी घेतली आहे. दीपक पहिले सौराष्ट्रकडून खेळत होता. टीम पूनियाच्या कागदपत्रांवर संतुष्ट होती. पूनियानं एनओसीची औपचारिकता पूर्ण केल्यामुळे त्याला हरियाणाकडून खेळायला परवानगी देण्यात आल्याचं स्पष्टीकरण बीसीसीआयनं दिलं आहे.


पूनियाचं स्पष्टीकरण


मी हरियाणाकडून खेळणार असल्याचं मी नेव्ही ऑफिसरला सांगितल्याचा दावा पूनियानं केला आहे. ड्यूटीवर असताना मी दुसऱ्या राज्याकडून खेळू शकणार नाही. पण सुट्टी घेऊन दुसऱ्या राज्याकडून खेळता येऊ शकेल, असं मला सांगण्यात आलं. त्यामुळे मी ३० दिवसांची सुट्टी घेऊन खेळायला सुरुवात केली. यानंतर सुट्टी वाढवण्यासाठी सांगितलं असता नकार देण्यात आल्याचं पूनिया म्हणाला.


कामावर परत न आल्यास अटक वॉरंट काढण्याचा इशाराही देण्यात आला आणि आता अटक वॉरंट पाठवल्याची प्रतिक्रिया पूनियानं दिली आहे. दुसरे खेळाडूही नोकरी करत असताना इतर राज्यांकडून खेळत आहेत. याआधी कोणालाच याबाबत समस्या नव्हती, पण आता मी हरियाणाकडून खेळू शकणार नाही, असं वक्तव्य पूनियानं केलं आहे.