Mohammed Siraj Birthday : कोलंबोचं हिरवंगार मैदान... टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा टॉसला आला तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. कारण सामनाच खास होता.. भारत विरुद्ध श्रीलंका... आशिया कपची फायनल. टीम इंडियाने टॉस जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला. 50 ओव्हरची आहे आरामात बघू, रात्री उशिरापर्यंत चालेल रे मॅच.. असं म्हणून झोपलेला मित्र दीड तासाने उठला तेव्हा सामना संपल्याचा पाहून धक्काच बसला. त्याला कारण होतं मिया मॅजिक... पाकिस्तानला घाम फोडणाऱ्या श्रीलंकेला मोहम्मद सिराजने आपल्या जादुई स्पेलच्या गुडघ्यावर टेकवलं. मोबाईल नंबर लिहतोय की स्कोरकार्ड असं देखील वाटत असेल. मोहम्मद सिराजचे इनस्विंग बॉल फलंदाजाला दिसत सुद्धा नसावे, एकाच ओव्हरमध्ये सिराजने कहर केला अन् भारताने वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात मोठा विजय मिळवला. याच मोहम्मद सिराजचा आज वाढदिवस... मोहम्मद सिराजचा प्रवास साधासोपा कधीच नव्हता. याच मोहम्मद सिराजच्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडीओ शेअर केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोहम्मद सिराज आज 30 वा वाढदिवस साजरा करत आहे. 13 मार्च 1994 रोजी हैदराबादमध्ये जन्मलेल्या सिराजच्या संघर्षाची कहाणी अंगावर काटा आणणारी आहे. सिराजच्या 30 व्या वाढदिवसानिमित्त बीसीसीआयने एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यात सिराजने त्याच्या संघर्षाबद्दल सांगितलं. सिराजच्या घरातील परिस्थिती हालाकिची होती. मोठ्या भावांचा खर्च अन् वडिलांच्या एकट्या नोकरीवर घर भागत नसल्याने सिराजने वयाच्या 18 व्या वर्षी कॅटरिंग सेक्टरमध्ये काम सुरू केलं. पण सिराजला क्रिकेटचं वेड होतं. सिराजने क्रिकेटसाठी एक वर्ष देयचं ठरवलं. त्यानंतर मी क्रिकेट सोडणार होतो, असं सिराज बीसीसीआयच्या व्हिडीओमध्ये सांगतो.


मला जेव्हा क्रिकेटमधून काही पैसे मिळायचे तेव्हा 100 -200 रुपये असायचे, त्यातील 150 रुपये घरी देयचे अन् 50 रुपये स्वत:कडे ठेवायचे. मी केटरिंगचं काम करत असताना माझ्या हाताला चटके बसायचे. कारण रुमाल रोटी असायची, त्याला पलटताना हाताला इजा व्हायच्या, त्यावरच मला क्रिकेट खेळावं लागायचं. घरी एक प्लॅटिना होती, पण तिला धक्का मारून सुरू करावं लावायचं, असंही सिराज म्हणतो. बीसीसीआयच्या व्हिडीओमध्ये सिराजने आपली आवडती जागा दाखवली. लहानपणी आपण कुठं खेळायचो, त्याचे ठिकाण दाखवलं.



दरम्यान, सिराज आमच्याकडे येतो, तेव्हा तो आधीसारखाच वागतो. त्याला कोणताही गर्व नाही. आमच्याकडे पोरं क्रिकेट खेळायला येतात, तेव्हा तेही म्हणतात आम्हाला मोहम्मद सिराज व्हायचंय, असं सिराजच्या सवंगडी बीसीसीआयच्या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे.