भारतीय नेमबाज मनु भाकरने (Manu Bhaker) ऑलिम्पिकमध्ये दोन कांस्यपदक (Bronze Medal) जिंकत इतिहास रचला आहे. एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनु भाकर पहिली भारतीय खेळाडू ठरली आहे. मनु भाकरने पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये वैयक्तिक आणि मिक्स इव्हेंटमध्ये सबरजोत सिंगमध्ये पदक जिंकलं. मनु भाकरकडे हॅट्ट्रीक करण्याची संधी होती. मात्र 25 मीटरमध्ये ती चौथ्या स्थानावर राहिल्याने संधी हुकली. दरम्यान पॅरिस ऑलिम्पिकमधील आपल्या कामगिरीमुळे मनु भाकरने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतलं आहे. यादरम्यान तिचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये ती 'काला चष्मा' गाण्यावर नाचताना दिसत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

व्हायरल झालेल्या व्हिडीओत मनु भाकरने तिचा सत्कार करण्यासाठी आयोजित कार्यक्रमात हजेरी लावल्याचं दिसत आहे. यादरम्यान शाळकरी मुलांसह तिने कतरिना कैफच्या 'काला चष्मा' गाण्यावर डान्स केला. मनु भाकरचा हे वेगळा अंदाज क्रीडा चाहत्यांना आवडला असून व्हिडीओ व्हायरल झाला आहे. 



मनु भाकरकडून प्रशिक्षक जसपाल राणा यांचं कौतुक 


मनु भाकरच्या यशात तिचे प्रशिक्षक जसपाल राणा यांचा मोठा वाटा आहे. मनु भाकर जसपाल राणा यांना पित्याप्रमाणे मानते. नुकतंच मनु भाकरने संपादकांशी संवाद साधताना आपला प्रवास उलगडला. यावेळी तिने सांगितलं की, "मी म्हणेन की ते मला वडिलंप्रमाणे आहेत. आणि हा एक विश्वासाचा भाग आहे जो तुम्ही एखाद्यावर टाकता".


"जेव्हा कधी मला मी हे करु शकते की नाही अशी शंका वाटते तेव्हा ते मला फार धैर्य देतात. ते कदाचित मला कानाखाली मारतील आणि म्हणतील तू हे करु शकतेस, यासाठीच तू प्रशिक्षण घेतलं आहेस," अशा भावना मनु भाकरने व्यक्त केल्या. यावेळी जसपाल राणा यांनी तिला रोखलं आणि येथे तू वाद निर्माण करत आहेस असं सांगितलं. 


यानंतर मनु भाकरनेही लगेच आपल्या विधानावर स्पष्टीकरण देत म्हटलं की, "म्हणजे खऱोखरची कानाखाली नाही, मी फक्त एक शब्द वापरत आहे. ते मला माझ्या मर्यादेपक्षा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करतात. तू यासाठीच ट्रेन झाली असून, तू तुझी सर्वोत्तम कामगिरी देऊ शकतेस असं ते सांगत असतात". यानंतर मनु भाकर आणि जसपाल राणा हसू लागतात. 


"आम्ही 14 महिन्यांपूर्वी सुरुवात केली होती. तेव्हा माझ्या बाजूने तिला फक्त एकच विनंती होती की भुतकाळावर चर्चा करायची नाही. आपम येथून सुरुवात करू आणि पुढे जाऊ. त्यामुळे आम्ही ती गोष्ट कायम ठेवली," असं राणा यांनी सांगितलं. "माझे काम तिचे संरक्षण करणं आहे. हे फक्त प्रशिक्षणाबद्दल नाही. या स्तरावर, तुम्ही त्यांना ट्रिगर कसा ओढायचा, पाहायचं कसं अशा गोष्टी शिकवू शकत नाही. फक्त त्यांनी संरक्षण देणं आवश्यक आहे," असं त्यांनी सांगितलं.


पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पॅरिस ऑलिम्पिकमधून सहा पदकांसह परतलेल्या भारतीय खेळाडूंची भेट घेतली. मनू भाकरने यावेळी मोदींना दोन कांस्यपदक मिळवून देणारी पिस्तूल दाखवली. पॅरिस गेम्समध्ये सलग दुसऱ्यांदा कांस्यपदक जिंकणाऱ्या भारतीय पुरुष हॉकी संघाने पंतप्रधानांना सर्व खेळाडूंनी स्वाक्षरी असलेली हॉकी स्टिक दिली. नुकतेच निवृत्त झालेले पीआर श्रीजेश आणि कर्णधार हरमनप्रीत सिंग यांच्यासह खेळाडूंनी नरेंद्र मोदींसह फोटोही काढला.