नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पुरुष क्रिकेटच्या विश्वात रविवारचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा ठरणार आहे. कारण इंग्लंडमध्ये सुरु असणाऱ्या विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान हे दोन्ही संघ एकमेकांसमोर उभे ठाकणार आहेत. क्रीडारसिकांसाठी परवणी असणाऱ्या या सामन्यापूर्वीचं वातावरणही पाहण्याजोगं आहे. ज्या धर्तीवर भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने संघातील खेळाडूंना एक महत्त्वाचा संदेश दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अंतिम सामन्याहून जास्त उत्कंठा वाढवणाऱ्या या भारत- पाकिस्तान सामन्यापूर्वी विराट कोहली याने भारतीय खेळाडूंना शांत, एकाग्र आणि अतिशय चिकाटीने खेळण्याचा संदेश दिला आहे. 'कोणत्याही परिस्थितीत अतिउत्साहाच्या भरात अती भावनिक खेळाचं प्रदर्शन आम्ही करुच शकत नाही', असा इशारा त्याने खेळाडूंना दिला आहे. 


खेळाडूंचा परिस्थितीकडे पाहण्याचा दृष्टीकोन हा चाहत्यांपेक्षा पूर्णपणे वेगळा असतो, ही महत्त्वाची बाब त्याने स्पष्ट केली. मैदानावर असतेवेळी खेळाडूंच्या निर्णयक्षमतेमध्ये अचूकपणा असलाच पाहिजे, असं म्हणत खेळाडूंच्याच दृष्टीने चाहतेही विचार करतील असं नाही. कारण, ते एकंदर वातावण पाहता व्यक्त होत असतात. किंबहुना खेळाडूप्रमाणेच विचार करणं सोपं नाही, ही बाब स्वीकारार्ह असल्याचं विराटने स्पष्ट केल्याची माहिती आयसीसीकडून देण्यात आली. 


'आम्ही चांगलं प्रदर्शन केलं अथवा नाही केलं तरीही ही स्पर्धा आमच्यासाठी या वळणावर संपणार नाही. त्यामुळे लक्ष्य हे कायम निर्धारित आणि मोठ्या स्वरुपाचं असावं', असं विराट म्हणाला. विराटचं हे वक्तव्य आणि खेळाडूंप्रती असणारा त्याचा आत्मविश्वास पाहता क्रिकेटच्या या वातावरणाला आणखी रंगत आली आहे. शिवाय त्याचा हा कानमंत्र खेळाडू मैदानावर कशा प्रकारे अवलंबात आणतात हे अवघ्या काही तासांमध्येच स्पष्ट होणार आहे.